...म्हणून रवींद्र मराठेंना अटक केली, राज ठाकरेंचे गंभीर आरोप

डी.एस.कुलकर्णींना कर्ज दिल्याप्रकरणी महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष रवींद्र मराठेंना पुणे पोलिसांनी अटक केली.

Updated: Jun 26, 2018, 05:27 PM IST

मुंबई : डी.एस.कुलकर्णींना कर्ज दिल्याप्रकरणी महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष रवींद्र मराठेंना पुणे पोलिसांनी अटक केली. मराठेंना अटक केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत. पीक कर्ज वाटपाच्या इनक्वायरीवर मराठे होते आणि त्यांनी यासगळ्या प्रकरणातला फोलपणा बाहेर काढला म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला आहे. 

नोटबंदीच्या काळात भाजप अध्यक्ष अमित शाह संचालक असलेल्या बँकेत जास्त नोटा बदलून देण्यात आल्या. वेणुगोपाल धूत यांना दिलेल्या कर्जामध्ये आयसीआयसीआयच्या चंदा कोचर यांचं नाव आलं. अमित शाह आणि चंदा कोचर यांच्यावर कारवाई होत नाही मग रवींद्र मराठेंना अटक कशी होते, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. महाराष्ट्र बँकेला बँक ऑफ बडोदामध्ये विलीन करण्याचा सरकारचा डाव असल्याची माहिती आहे. हे खरं असेल तर ते भयंकर असल्याचं राज ठाकरे म्हणाले. अशाप्रकारची कारवाई करताना आरबीआय आणि अर्थमंत्र्यांची परवानगी लागते. अशी परवानगी नसताना पुणे पोलिसांनी मराठेंना अटक कशी केली, असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला.