मुंबई : दादर-माटुंगा रेल्वे मार्गादरम्यान रेल्वे परिक्षणार्थींनी आंदोलन करत लोकल रेल्वे रोखून धरलीय. त्यांचं नेमक काय म्हणणं आहे, काय आहेत त्यांच्या मागण्या? जाणून घेऊ...
आंदोलक तरुणांनी रेल्वेत अप्रेन्टिसशिप केली आहे. पूर्वी रेल्वे प्रशासनात प्रशिक्षणार्थींना थेट रेल्वेत सामावून घेतलं जायचं, यावेळीही सर्व प्रशिक्षणार्थींना रेल्वे नोकरीत सामील करून घ्यावं, अशी त्यांची मागणी आहे. प्रशिक्षणार्थींसाठी सरकारनं २० टक्के कोटा लागू केलाय... परंतु, रेल्वे प्रशासनात नोकरीच्या संधी कमी झाल्यानं आम्हाला वन टाईम सेटलमेंट मिळायला हवं, पाच - सहा वर्ष प्रशिक्षण घेणाऱ्यांना कायम स्वरुपी नोकरीत घ्यावं, अशी मागणी करत हे प्रशिक्षणार्थी आंदोलनात सहभागी झालेत.
रेल्वे प्रशासनाला आंदोलनाची अनेकदा पूर्वसूचना देण्यात आली होती, असंही या आंदोलकांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतातून आलेले रेल्वे अप्रेन्टिस करणारे हे तरुण इथं आंदोलनात सहभागी झालेत.
या आंदोलनाची माहिती देताना 'कुठल्या तरी आंदोलनामुळे रेल्वेचा खोळंबा झाल्याचं' मध्य रेल्वेनं सोशल मीडियावर म्हटलंय.
Due to some agitation between Matunga and Dadar, rail traffic affected between Matunga and CSMT...
— Central Railway (@Central_Railway) March 20, 2018
या अगोदर या तरुणांनी दिल्लीमध्ये जंतर-मंतरवर १० दिवस आंदोलन केला होता. आज सकाळीच मुंबईचा खोळंबा झाल्यानंतरही रेल्वे प्रशासनानं संपर्क साधला नसल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे.
रेल्वे प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आपण आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतलीय.