करीरोडचं लालबाग, सँडहर्स्टचं डोंगरी आणि... मुंबईतील रेल्वे स्थानकांना मिळणार नवी ओळख

Mumbai Railway Station : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी.... मुंबईतल्या काही स्टेशन्सची नावं बदलण्याची शक्यता आहे. यासंदर्भात खासदार राहुल शेवाळेंची संबंधित विभागांशी आज बैठक झाली. उद्या होणा-या कॅबिनेट बैठकीमध्ये यावर निर्णय होणार आहे. 

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Mar 12, 2024, 06:27 PM IST
करीरोडचं लालबाग, सँडहर्स्टचं डोंगरी आणि... मुंबईतील रेल्वे स्थानकांना मिळणार नवी ओळख title=

Mumbai Railway Station : मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेला आता लवकरच नवी ओळख मिळणार आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलून नवी नावे द्यावी, अशी मागणी शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे (Rahul Shewale) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. या मागणीला राज्य सरकारने तत्वतः मंजुरी दिली असून कॅबिनेट निर्णयानंतर राज्य सरकारच्या वतीने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. यामुळे मुंबईतील रेल्वे स्थानकांचे (Mumbai Railway Stations) लवकरच नामांतर होणार आहे.

खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, मुंबईतील अनेक रेल्वे स्थानके आजही ब्रिटिशकालीन नावाने ओळखली जातात. मात्र, या रेल्वे स्थानकांच्या परिसरातील इतिहास पाहता, या स्थानकांच्या नामांतराची मुंबईकरांची मागणी आहे. करी रोड रेल्वे स्थानकाला लालबाग तर मरीन लाईन्स स्थानकाला मुंबादेवी यांसह एकूण सात रेल्वे स्थानकांचे नामांतर करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. याशिवाय राज्य सरकारच्या वतीने या आधीच मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नामांतर नाना जगन्नाथ शंकरशेठ रेल्वे स्थानक करण्याचा प्रस्ताव या केंद्र सरकारला पाठविण्यात आला आहे. 

नामांतरासाठी प्रस्तावित रेल्वे स्थानके

1. करी रोड - लालबाग
2. सँडहर्स्ट रोड - डोंगरी
3. मरीन लाईन्स - मुंबादेवी
4. चर्नी रोड - गिरगाव
5. कॉटन ग्रीन -काळाचौकी
6. डॉकयार्ड - माझगाव
7. किंग्ज सर्कल - तीर्थंकर पार्श्वनाथ
8. मुंबई सेंट्रल - नाना जगन्नाथ शंकरशेट 

भारतीय पारतंत्र्याची ओळख पुसण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याची जनतेची मागणी होती. ही जनतेची भावना राज्य सरकारपर्यंत पोहोचवली. या मागणीला तत्त्वत: मंजुरी दिल्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्याचे आभार मानतो. लवकरच याबाबत मंत्रिमंडळ निर्णय करून हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल.