दहशतवादी हल्ला : राज्य सरकारकडून दोन शहीद जवानांना प्रत्येकी ५० लाखांची मदत

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झालेत. या शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना  प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

Updated: Feb 15, 2019, 05:56 PM IST
दहशतवादी हल्ला : राज्य सरकारकडून दोन शहीद जवानांना प्रत्येकी ५० लाखांची मदत title=

मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झालेत. या शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना धीर देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तुम्ही काळजी करू नका. आम्ही सर्व जण तुमच्या पाठीशी आहोत, असे सांगितले. त्याचसोबत जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यात राज्यातील दोन जवानांना वीरमरण आले आहे. संजय राजपूत आणि नितीन राठोड अशी या शहीद जवानांची नावे आहेत. या दोघांच्याही कुटुंबीयांना राज्य सरकारकडून ५० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.या हल्ल्याबाबत सर्वांच्या मनात राग आहे. दहशवाद्यांनी जवानांच्या गाडीवर भ्याड हल्ला केला आहे, त्याचा निषेध करतो, अशा देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सिद्धिविनायक मंदिराकडून ५१ लाखांची मदत 

पुलवामात दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना श्री सिद्धिविनायक मंदिराकडून ५१ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. शिवाय, जखमी जवानांसाठी काम करणाऱ्या पुण्यातील क्विन मेरी संस्थेलाही २५ लाखांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या हल्ल्याचा निषेध करत संस्थेचे अध्यक्ष आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनी तातडीची बैठक घेत राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठवला आला आहे.