मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत हिला मुंबईचा उल्लेख पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने ती चांगलीच अडचणीत आली आहे. शिवसेनेने तिच्याविरोधात आक्रमकपणा घेतला असताना तिनेही शिवसेनेला जशाचतसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेशी पंगा घेणाऱ्या कंगना रानौतविरोधात विधिमंडळात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे कंगनाच्या ऑफिसला नोटीस देऊन मुंबई महापालिकेनंही दिला दणका दिला आहे. मै मुंबई जा के बोलुंगी, अशी कंगनाने सावध प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्री कंगनाच्या मुंबई विरोधी वक्तव्याचा मुद्दाही आज विधिमंडळात चांगलाच गाजला. काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी कंगनाच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडला. तर मुंबई पोलिसांबद्दल बेजबाबदार वक्तव्य केल्याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. सिनेसृष्टीतील ईस्लामी वर्चस्व संपवल्याच्या कंगनाच्या वक्त्तव्याचा सपा आमदार अबू आझमी यांनीही निषेध केला.
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सकाळी आज कंगनाच्या ऑफीसमध्ये जाऊन नोटीस लावली. कंगनाने राहत्या घराची व्यावसायिकरित्या ऑफिसमध्ये रुपांतर केल्याने अनेक अनधिकृत गोष्टी यात केल्या असल्याची पालिकेची तक्रार आहे. त्यामुळे कलम ३५१ अंतर्गत पालिकेने कंगनाला या ऑफीससाठी नोटीस बजावली आहे. २४ तासात स्पष्टीकरण आणि अतिरिक्त बांधलेले बांधकाम अधिकृत असल्याचे पुरावे द्यावेत, असे आदेश पालिकेने दिले आहेत. अनधिकृत बांधकाम स्वतः काढून टाका नाही, तर पालिका हे बांधकाम तोडणार असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
कंगनाच्या कार्यालयात अनधिकृत बांधकाम
- ग्राऊंड फ्लोअरवरील टॉयलेटला ऑफिस केबिन मध्ये रूपांतरीत केले आहे
- स्टोअर रूमचा किचन रूम मध्ये रूपांतर
- ग्राऊंड फ्लोअरवर पायऱ्यांवर अनधिकृत टॉयलेट
- तळ मजल्यावर अनधिकृत किचन तयार
- देवघर आणि लिव्हिंग रूम अनधिकृत केबिन आणि लाकडी पार्टिशन
- पहिल्या मजल्यावर अनधिकृत शौचालय
- समोर बाजूस अनधिकृत सैलब ची निर्मिती
- दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत जिना निर्मिती
- दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत बाल्कनी निर्मिती