वित्तीय सेवा सोडून खासगी कार्यालये बंद, शासकीय कार्यालयात ५० टक्के उपस्थिती

खाजगी कार्यालयांसाठी शासनाच्या सूचना

Updated: Apr 4, 2021, 09:13 PM IST
वित्तीय सेवा सोडून खासगी कार्यालये बंद, शासकीय कार्यालयात ५० टक्के उपस्थिती title=

मुंबई : राज्यात कोरोना झपाट्याने वाढता असताना त्याचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाणार आहे. हे निर्बंध लावतांना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे.

खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज, पाणी पुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील.

शासकीय कार्यालये ५० टक्के उपस्थितीत

शासकीय कार्यालये जी थेट कोरोनाशी संबंधित नाहीत तेथील कर्मचारी उपस्थिती 50 टक्के मर्यादेपर्यंत राहील. शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश नसेल. आवश्यक असेल तर कार्यालय किंवा विभाग प्रमुखाचा प्रवेश पास लागेल. कार्यालयांतील बैठका ऑनलाईनद्वारे घ्याव्यात. केवळ कार्यालय परिसरातल्या कर्मचाऱ्यांना वैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल.

शेतीविषयक कामे , सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला.