मुंबई : म्हाडाच्या नवीन जाहीरातीत घरं घेणं सामान्यांसाठी अशक्यप्राय असल्याचं दिसून येतंय. इतकंच नाही तर उत्पन्न गट आणि घरांच्या किंमतीत प्रचंड विसंगती यात आढळून येतेय.
सामान्यांच्या आवाक्यातली घरं म्हणून म्हाडाची घरं प्रसिद्ध... पण यंदाच्या लॉटरीतली लोअर परळ भागातली म्हाडाची घरं तब्बल दोन कोटी रुपयांना आहेत.
- ८१९ पैंकी २०४ घरांची किंमत दीड ते दोन कोटींच्या आसपास आहे. त्यामुळं मंबईत आपलंही घर असावं, असं स्वप्न पाहणाऱ्यांना ही किंमत ऐकूनचं घाम फुटण्याची शक्यता आहे.
- लोअर परेल येथील ४७५ चौरस फूटांची २ घरे असून त्याची किंमत १ कोटी ९५ लाख ६७ हजार इतकी निर्धारित करण्यात आलीय. म्हणजे ४१ हजार रूपये प्रति चौरस फूट...
- ३६३ चौरस फूटांची ३४ घरे असून त्याची किंमत १ कोटी ४२ लाख ९६ हजार इतकी आहे. म्हणजे प्रति चौरस फूट ३९ हजार रूपये...
- ही घरे उच्च उत्पन्न गटासाठी असली तरी या परिसरातील बाजारभावही म्हाडा घरांच्या किंमतीच्या आसपास आहे.
- सर्वात कमी किंमतीचे अत्यल्प उत्पन्न गटासाठीचे केवळ एकच घर मागाठाणे, बोरीवलीत आहे. ज्याची किंमत १६ लाख ५२ हजार आहे.
मुंबईतल्या स्वस्त घरांसाठी म्हाडाची जाहिरात प्रसिद्ध झालीय. तब्बल ८१९ घरांसाठी ही सोडत काढण्यात येणार आहे. १६ सप्टेंबरपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. तर १० नोव्हेंबरला या घरांची सोडत निघणार आहे. मुंबईतल्या विविध भागांमध्ये ही घरं आहेत. सर्वात जास्त म्हणजे ३३८ घरं ही उच्च उत्पन्न गटातील असून मध्यम उत्पन्न गटात २८१ सदनिका उपलब्ध आहेत. तर अल्प उत्पन्न गटासाठी १९२ घरांची सो़डत निघणार आहे. उच्च उत्पन्न गटाकरिता लोअर परेल, तुंगा, चारकोप, कांदिवली आणि शिंपोलीमध्ये घरं आहेत.