राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा, उद्धव ठाकरे यांनी केली घोषणा

'द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यामागे दबाव होता? पाहा उद्धव ठाकरे यांनी काय सांगितलं

Updated: Jul 12, 2022, 05:59 PM IST
राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा, उद्धव ठाकरे यांनी केली घोषणा title=

President Election 2022 : राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. आज मुंबईत पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

काल मातोश्रीवर झालेल्या बैठकीत खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी दबाव आणल्याचं वृत्त पसरलं होतं, पण या बैठकीत कोणताही दबाव माझ्यावर आणलेला नाही. सर्वांनी सांगितलं तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल असं सांगितल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

आज माजी आमदारांबरोबर चर्चा केली, खासदारांबरोबर करतोय, जिल्हाप्रमुखांबरोबर करतोय, विशेष म्हणजे आदिवासी समाजात काम करणाऱ्या शिवसैनिकांनी विनंती केली आहे, प्रथमच आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्रपती होण्याची संधी मिळतेय, आमच्या समाजाला वेगळी ओळख मिळतेय, देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान होऊ शकतात. तर आपण त्यांना पाठिंबा दिला तर आम्हाला सर्वांना आनंद होईल

या विनंतीचा आणि प्रेमाने जो आग्रह केला, त्या सर्वांचा मान ठेऊन शिवेसना राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत आहे. पण हा पाठिंब देण्यामागे कोणताही दबाव नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.  

शिवसेनेने कधीच राष्ट्रपतीपदासाठी कोत्या मनाने विचार केलेला नाही. प्रतिभाताई पाटील यांचं नाव आलं, तेव्हाही शिवसेनाप्रमुखांनी पक्षाच्या पलिकडे जाऊन देशाचा विचार केला आणि प्रतिभाताईंना पाठिंबा दिला होता. प्रणव मुखर्जी यांनाही पाठिंबा दिला होता असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.