मुंबई : हिंगोलीतील शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी आज मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी मुंबईत धडक मारली. बांगर यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केल्यानंतर आमदार बांगर यांनी थेट मातोश्रीला आव्हान देत आपली कुणी हकालपट्टी करू शकत नाही अस म्हटलं होतं.
त्यानंतर ते शेकडो कार्यकर्त्यांसह सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाले. याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांचं स्वागत केलं. संतोष बांगर हे लोकांच्या सेवेसाठी तत्पर असतात, त्यामुळे संतोष बांगर हेच हिंगेलीचे जिल्हाप्रमुख असतील हेही एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) स्पष्ट केलं.
संतोष बांगर आणि सर्व पदाधिकारी इथे आले, त्यांची शक्ती किती आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे. त्यांचे विकासकामांचे प्रश्न असतील त्यांना आम्ही मदत करु असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोरोना काळात बांगर यांनी स्वत:ची बँक एफडी मोडून लोकांना मदत केली आहे. लोकांच्या सुख-दु:खात ते धावून जात असतात याची पूर्ण कल्पना मला आहे. त्यामुळे तेच हिंगोलीचे जिल्हाप्रमुख आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
हा बाळासाहेबांच्या विचारांचा गट आहे, ज्यांना हिंदुत्त्वाची भूमिका पटत आहे ते सोबत येत आहेत, ज्यांना आमचे विचार पटले आहेत त्यांना आमच्या सोबत काम करायचं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
आमदार असो वा खासदार त्यांची विकासकामं राज्यसरकार प्रलंबित ठेवणार नाही. सेना आणि भाजप युतीचं सरकार विकास कामं करतील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.