मुंबई : घाटकोपरमध्ये गुजराती समाजातील वजनदार नेते प्रवीण छेडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये नगरसेवक म्हणून कारकिर्द गाजवल्यानंतर प्रकाश मेहतांशी असलेल्या वादातून २०१२ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१२ मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते. महापालिकेत विरोधी पक्षनेते पदही त्यांनी भुषवले आहे. अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत प्रकाश मेहतांकडून त्यांचा पराभव झाला होता. २०१७ मध्ये पालिका निवडणुकीत भाजपचे पराग शहांनी त्यांना पराभूत केले होते. प्रकाश मेहतांना शह देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना भाजपमध्ये घेतल्याचे बोललं जातं आहे.
प्रवीण छेडा यांनी यावेळी म्हटलं की, 'संघपरिवारने शिक्षण दिले, ३ वेळा नगरसेवक म्हणून काम केलं. मला मुंबई उत्तरची जागा काँग्रेस देत होती. ती सोडून मी भाजपमध्ये आलो आहे. पुन्हा माझ्या परिवारात परत आलो आहे. पक्ष जी जवाबदारी देईन ती पार पाडेल.'
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षबदल जोरात सुरू आहे. मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते प्रविण छेडा यांनी घरवापसी केली आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवीण छेडा यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत ईशान्य मुंबईतील उमेदवारी जाहीर केली नव्हती. सध्या येथून भाजपचे किरीट सोमय्या हे खा खासदार आहेत. सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे प्रवीण छेडा यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे.