राज्यातील 'या' शहरात मिळतंय 1 रुपये लीटर पेट्रोल; पंपावर गाड्यांची तुफान गर्दी

मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 120.51 आहे. मात्र ठाण्यातील 'या' पेट्रोल पंपावर पेट्रोल एक रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. 

Updated: Apr 25, 2022, 03:01 PM IST
राज्यातील 'या' शहरात मिळतंय 1 रुपये लीटर पेट्रोल; पंपावर गाड्यांची तुफान गर्दी title=
representative image

मुंबई : देशभरात पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. परंतू  ठाण्यात पेट्रोल 1 रुपये प्रति लिटरने उपलब्ध आहे. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. मात्र हे पूर्णपणे सत्य असून पेट्रोल घेण्यासाठी येथे लोकांची लांबच लांब रांग आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या जन्मदिवसानिमित्त ठाण्यातील कैलास पेट्रोल पंपावर 1 रुपये लिटर पेट्रोल दिले जात आहे. आज सरनाईक यांचा जन्मदिवस आहे.

1000 चालकांना दिले पेट्रोल 

ठाणे महापालिकेच्या माजी नगरसेवक आशा डोंगरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संदीप डोंगरे आणि अब्दुल सलाम यांनी कैलास पेट्रोल पंपावर सकाळी 10 वाजता स्वस्त पेट्रोल देण्यास सुरुवात केली. सुमारे 1000 चालकांना 1 रुपये प्रतिलिटर पेट्रोल देण्यात आले. या पेट्रोलची किंमत 1 लाख 20 हजार इतकी होती. देशातील वाढत्या पेट्रोलच्या दरांविरोधात शिवसेनेच्या वतीने प्रतिकात्मक निषेध करण्यात आला. यावेळी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी पाहायला मिळाली.

20 व्या दिवशी पेट्रोलच्या दरात कोणताही बदल नाही

सोमवारी सकाळी देशातील बड्या तेल कंपन्यांनी सलग 20 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 120.51 रुपये तर डिझेलचा दर 104.77 रुपये प्रतिलिटर आहे. अशा परिस्थितीत 1000 चालकांना 1 रुपये लिटरने पेट्रोल दिल्यास मोठा दिलासा मिळणार आहे.

गेल्या महिन्यात ईडीने आमदार प्रताप सरनाईक यांची 11.35 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.