मुंबई : बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय बुधवारी उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयानं दिला. बाबरी मशिद विध्वंस babri masjid demolition प्रकरणाच्या खटल्यात सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. पण, सदर निर्णय़ देशहिताचा नसल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
बाबरी मशिद विध्वंस प्रकरणीचा निर्णय आल्यानंतर सर्व स्तरांतून याबाबतच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. ज्यामध्ये आंबेडकर यांनी आपलं ठाम मत मांडलं. बाबरी मशिद पाडणं हे नियोजित षड्यंत्र नव्हतं, त्यामुळे ३२ लोकांना विशेष सीबीआय न्यायालयानं निर्दोष मुक्तता दिली. मात्र, अडवाणी यांनी काढलेली रथयात्रा ही बाबरी मशिद पाडण्यासाठीच होती. त्यामुळं न्यायालयाने दिलेला हा निकाल देशहिताचा नाही असं ते म्हणाले.
किंबहुना अशा निकालामुळं जनतेचा न्यायालयीन प्रक्रियेवरील विश्वास उडून जाईल, असं मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.
आयोध्या, बाबरी मशीद प्रकरणावर आज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला असून यामध्ये प्रामुख्याने लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह इतर ३२ जणांवर बाबरी मशीद पाडल्याचा आरोप होता.
दरम्यान बुधवारी आलेल्या निकालांमध्ये सर्वाना निर्दोष जाहीर करण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर धार्मिकतेला वाव दिला जात असून, देशाला कमी लेखण्याचं काम केलं जात आहे. त्यामुळं कायदेशीरदृष्ट्या या निकालाला पुन्हा आवाहन दिलं गेलं पाहिजे आणि तथ्यांच्या आधारावर ज्यांनी बाबरी मशिद पाडली आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली.