'आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक, आता प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला... राज्यात लोकप्रतिनीधीही सुरक्षित नाहीत'

'गृहमंत्री फडणवीसांची पोलीस दलावर पकड नाही म्हणून गुन्हेगारांची हिम्मत वाढलीय' काँग्रेसचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

Updated: Feb 9, 2023, 01:43 PM IST
'आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक, आता प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला... राज्यात लोकप्रतिनीधीही सुरक्षित नाहीत' title=

मुंबई : काँग्रेसच्या महिला आमदार डॉ. प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांच्यावर केलेला हल्ला हा महाराष्ट्रात गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचे उदाहरण आहे, शिंदे फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadanvis Government) गुन्हेगारी वाढली असून लोकप्रतिनीधीवर हल्ले होत असतील तर हे गंभीर असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलीस दलावर वचक नसल्याचं दिसत आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. शिंदे-फडणवीसांच्या राज्यात लोकप्रतिनीधीही सुरक्षित राहिले नसून काँग्रेस आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्याचा निषेध
आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे फडणवीस सरकारचा समाचार घेतला. शिंदे फडणवीस सरकारमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदारच खुलेआम दादागिरी करत आहेत, हातपाय तोडण्याची धमकी दिली जाते, गोळीबार केला जातो पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे आणि विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनीधींची सुरक्षा काढून घेतल्या आहेत अशी टीका नाना पटोले यांनी केली.

'सरकारी यंत्रणा विरोधी नेत्यांवर कारवाईसाठी'
लोकप्रतिनिधींना लोकांमध्ये जावं लागते, त्यांच्याशी संवाद साधावा लागतो, विविध कार्यक्रमासाठी त्यांना जनतेमध्ये फिरावे लगते, पण असे हल्ले होत असतील तर लोकप्रतिनीधींनी काम कसं करायचं ? पोलीस दल आणि इतर सरकारी यंत्रणा काय फक्त विरोधी पक्षांच्या नेते व लोकप्रतिनीधींवर कारवाई करण्यासाठी राखीव ठेवल्या आहेत आहे का ? एका महिला लोकप्रतिनिधीवर हल्ला झाला तरी राज्याच्या गृहमंत्र्याची एका वाक्याची प्रतिक्रियाही आली नाही हे असंवेदनशिलपणाचे लक्षण असल्याची टीकाही पटोले यांनी केली.

लोकप्रतिनिधींवर हल्ला
आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांच्यावर कळमनुरी तालुक्यातील कसबे दवंडा गावात हल्ला करण्यात आला. दोन दिवसाआधी माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या औरंगाबाद दौऱ्यात त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. असे प्रकार वाढत असून गुन्हेगारांवर या सरकारचा वचकच राहिलेला नाही. विरोधी पक्षांच्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली असून केवळ सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना सुरक्षा पुरविली जात आहे. महाराष्ट्र कायद्याचे राज्य आहे, त्याचे जंगलराज करू नका, अशी मागणी पटोले यांनी केली. 

आ. प्रज्ञा सातव यांच्या पाठीशी प्रदेश काँग्रेस खंबीरपणे उभी आहे. विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनीधींवर पुन्हा हल्ला होणार नाहीत यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलावी आणि आमदार डॉ प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना आणि हल्ल्यामागील मास्टरमाईंड ला तातडीने अटक करून अद्दल घडवा, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

हल्ल्याप्रकरणी एकाला अटक
काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणात महेंद्र डोंगरदिवे या व्यक्तीला अटक झालीय. काल आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर कळमनुरी तालुक्यात हल्ला झाला होता. जिल्ह्यात अवैध धंदे कोण चालवतं हे सर्वश्रुत आहे असं सातव यांनी म्हटलंय. त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे याची चर्चा रंगलीय. 

मविआ नेत्यांची टीका
महिला लोकप्रतिनिधीवर हल्ला होणं खेदजनक अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केलीय. आमदार प्रज्ञा सातव यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे केलीय. तर राज्यात कायद्याबाबत अनागोंदी सुरु असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय.. राज्यात हल्ल्याचे अनेक प्रकार घडतायत. तेव्हा  विरोधी पक्षांच्या नेत्यांची सुरक्षा काढण्याचं कारण काय असा सवाल राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारला विचारलाय. गृहमंत्र्यांनी वेळीच पावलं उचलावीत असं आवाहनही राऊतांनी केलंय.

प्रज्ञा सातव यांच्यावर झालेला हल्ला हा अत्यंत दुर्दैवी आहे, या हल्ल्याचा निषेध सुषमा अंधारेंनी केलाय. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय. राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. फडणवीस गृहमंत्री म्हणून अपयशी ठरत आहेत की काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.