अभिनेत्री रश्मिका मंदानामुळे डीपफेकचं गांभीर्य समोर आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याची दखल घेतली आहे. नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करत तयार केल्या जाणाऱ्या डीपफेक व्हिडीओ, फोटोंमुळे निर्माण होणारे धोके सांगितले होतं. यावेळी त्यांनी चिंता व्यक्त करताना सोशल मीडियावर आपण काही महिलांसह गरबा खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचा दाखला दिला होता. दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं होतं की, "मी खरं तर शाळा सोडल्यापासून गरबा खेळलेलोच नाही. मी डीपफेक व्हिडीओचा शिकार झालो आहे".
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओत गरबा खेळणारी व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हते हे खरं आहे. पण हा व्हिडीओ आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने तयार करण्यात आलेला नव्हता. कारण व्हिडीओत दिसणारी व्यक्ती ही नरेंद्र मोदींचा डुप्लिकेट आहे. पण नरेंद्र मोदींना हा व्हिडीओ चुकून डीपफेक असल्याचं वाटलं.
विकास महंते व्यावसायिक असून मालाडमध्ये पॅकेजिंगचा व्यवसाय आहे. पण नरेंद्र मोदींच्या प्रसिद्धीमुळे त्यांचं नशीब चमकलं. याचं कारण ते हुबेहूब नरेंद्र मोदींसारखे दिसतात. याचमुळे अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांना आमंत्रित केलं जात असतं. त्यांची हे क्रेझ फक्त भारत नाही तर परदेशापर्यंत आहे. युकेमधील पंकज सोढा या व्यक्तीने त्यांना लंडनमध्ये आपल्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी करण्यासाठी नेलं होतं. याच कार्यक्रमात विकास महंते यांनी महिलांसह गरबा खेळला होता. यानंतर तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.
नरेंद्र मोदींपेक्षा 10 वर्षं छोटे असणाऱ्या विकास महंते यांनी एक व्हिडीओ जारी करत स्पष्टीकरण दिलं आहे की, "मी मोदींसारखा दिसत असल्याने भारत आणि परदेशातील अनेक कार्यक्रमांमध्ये आमंत्रित केलं जात असतं. तिथे मी मोदींचे विचार मांडण्याचा प्रयत्न करत असतो". तो व्हिडीओ डीपफेक नसून त्यात दिसणारी व्यक्ती मी आहे हे मला स्पष्ट करायचं आहे. मी एक व्यावसायिक आणि कलाकार आहे असंही ते म्हणाले आहेत.
व्हिडीओत विकास महंते यांनी नेहमीप्रमाणे नरेंद्र मोदींसारखी वेशभूषा केली असून गरबा खेळताना दिसत आहे. ते हुबेहुब मोदींसारखे दिसत असल्याने काहींचा गैरसमजही झाला होता. यामुळेच विकास महंते यांनी दिलेलं स्पष्टीकरण महत्त्वाचं ठरत आहे.
विकास महंते यांनी 2013 मध्ये नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. गुजरातचे आमदार रमनभाई पाटकर यांनी त्यांची भेट घडवून दिली होती. आम्ही गप्पा मारल्या होत्या. पण फोटो काढण्याची परवानगी मिळाली नाही असं त्यांनी सांगितलं.
विकास महंते यांचं वसईत स्टील पॅकेजिंग युनिट आहे. पण सध्या त्यांचा मुलगा हा व्यवसाय सांभाळतो. कारण विकास महंते वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये व्यग्र असतात. अनेक भाजपा तसंच इतर पक्षांचे समर्थक त्यांना उद्घाटन कार्यक्रमात बोलवत असतात. फक्त नोव्हेंबर महिन्यात त्यांनी अशा 8 कार्यक्रमांना हजेरी लावली आहे.