महाराष्ट्राची जनता महाराजांची वंशज - वादानंतर राऊतांची सारवासारव

सोबतच, उदयनराजे भोसलेंना सल्ला देण्यासाठी संजय राऊत विसरले नाहीत

Updated: Jan 16, 2020, 11:39 AM IST
महाराष्ट्राची जनता महाराजांची वंशज - वादानंतर राऊतांची सारवासारव title=

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊतांनी उदयनराजेंबाबत केलेल्या वंशाबद्दलच्या वक्तव्यावर सारवासारव केलीय. सातारा आणि कोल्हापूरच्या गादीचा नेहमीच आदर करत आलो आहोत. मात्र, सारा महाराष्ट्रच छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्याचं म्हणत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. शिवाजी महाराजांवर देशाच्या सर्व नागरिकांचा अधिकार आहे, त्यांची प्रेरणा सगळ्यांमध्येच आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलंय.

छत्रपती शिवाजी महाराज हा इतिहास आहे त्याचा अभ्यास करण्याची गरज नाही... महाराष्ट्राची जनता हेच महाराजांचे वंशज आहेत, असंही संजय राऊत यांनी म्हटलंय.

सोबतच आम्ही तुमचा आदर करतोच, आम्ही नेहमीच केवळ महाराजांच्या नावावर झुकत आलो आहोत. आपण उदयनराजे भोसले वंशावर कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. आम्ही तुमचा आदर करतो म्हणून तुम्हीही आमचा आदर करा... हातपाय तोडण्याची भाषा योग्य नाही, असा टोला संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांना लगावलाय.

'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तकावरून सुरू झालेल्या वादावर छत्रपती शिवरायांच्या वंशजांनी प्रतिक्रिया द्यावी, असं संजय राऊत यांनी आव्हान दिलं होतं. त्यावर भाजपचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राऊतांवर 'बिनपट्ट्याचा' म्हणत खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला होता. तसंच शिवसेना, शिववडा हे नाव ठेवताना शिवरायांच्या वंशजांची परवानगी घेतली होती का? असाही प्रश्न विचारला होता. यावर, प्रतिक्रिया देताना एका जाहीर मुलाखतीत संजय राऊत यांनी 'वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत' असा टोला लगावला होता. त्यानंतर हा वाद निर्माण झालाय.

दुसरीकडे, संजय राऊत यांचं हे विधान भाजपनं चांगलंच उचलून धरलंय. संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी करत भाजप आमदार राम कदम यांनी तर घाटकोपर पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन सुरू केलंय. तसंच साताऱ्यात संजय राऊत यांच्या छत्रपती घराण्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ उदयनराजे भोसले समर्थक आज निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.