अचानक ट्रेन आल्याने प्रवाश्याचा गोंधळ, पोलिसाच्या प्रसंगावधानाने वाचला जीव

रेल्वे रुळ ओलांडताना जीव वाचला

Updated: Jan 2, 2021, 04:41 PM IST
अचानक ट्रेन आल्याने प्रवाश्याचा गोंधळ, पोलिसाच्या प्रसंगावधानाने वाचला जीव title=

देवेंद्र कोल्हटकर, मुंबई : मुंबईच्या दहिसर रेल्वे स्टेशनवर पोलीस शिपायाच्या प्रसंगावधानाने प्रवाशाचा जीव वाचला आहे. दहिसर रेल्वे स्टेशनवरील घटना आहे. रेल्वे ट्रॅक ओलांडताना अचानक ट्रेन आल्याने एका प्रवाश्याचा गोंधळ उडाला. अखेर पोलीस शिपाई एस.बी निकम यांनी प्रवाशाला हात देत प्लॅटफॉर्मवर ओढलं. त्यामुळे या रेल्वे प्रवाशाचा जीव वाचला आहे. ही संपूर्ण घटना रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे.

जीवन मृत्यूचा हा थरार पाहा.... एवढी सगळी धडपड कशासाठी?... तर फक्त एक लोकल पकडण्यासाठी.... दहिसर रेल्वे स्टेशनवर एका प्रवाशानं लोकल पकडण्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावला... प्लॅटफॉर्मवर येणारी लोकल पकडण्यासाठी या महाभागानं रेल्वे रुळ ओलांडले. ज्या ट्रॅकवर लोकल येणार त्या फलाटावर चढण्याचा प्रयत्न केला. धांदलीत त्याचा पायातला बूट निघाला... तो महाभाग त्या बुटासाठी पुन्हा रुळावर गेला. 

लोकलची धडक बसणार एवढ्यात पोलीस कॉन्स्टेबल एस. बी. निकम यांनी बोलावलं... जीवन आणि मृत्यूत अवघं काही सेकंदाचं अंतर होतं... लोकल येत होती. प्रवासी प्लॅटफॉर्मवर चढत असतानाच निकम यांनी त्यांना ओढून घेतलं. बुटासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या या महाभागाच्या निकम यांनी कानशिलात लगावली. 

मुंबईत रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांचे मृत्यू सर्वाधिक आहेत. रेल्वे रुळ ओलांडणं धोकादायक असतानाही लोकं काही मिनिटांचा फेरा वाचवण्यासाठी उगाचच जीव धोक्यात घालतात हे पुन्हा अधोरेखित झालं आहे.

वारंवार अशा घटना घडतात. पण लोकं यापासून धडा घेताना दिसत नाही.