ग्रामविकास मंत्री म्हणून माझे शेवटचे 'महालक्ष्मी सरस' - पंकजा मुंडे

मुंबईत दरवर्षी भरणाऱ्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे बुधवारी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उदघाटन झाले.

Updated: Jan 23, 2019, 12:40 PM IST
ग्रामविकास मंत्री म्हणून माझे शेवटचे 'महालक्ष्मी सरस' - पंकजा मुंडे title=

मुंबई - मुंबईत दरवर्षी भरणाऱ्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे बुधवारी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी त्यांनी केलेल्या एका विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्याच्या ग्रामविकास मंत्री म्हणून मी यंदा शेवटचे या प्रदर्शनाचे उदघाटन करते आहे. निवडणुकीनंतर पुन्हा आमचीच सत्ता येईल, याची मला १०० टक्के खात्री आहे. पण माझ्याकडे काय जबाबदारी असेल, याची मला कल्पना नाही, असे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाची प्रशंसा केली. त्यांच्या नेतृत्त्वात महिलांना विविध ठिकाणी नेतृत्त्वाची संधी मिळाली, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. 

मुंबईतील वांद्रे येथे दरवर्षी महालक्ष्मी सरस प्रदर्शन भरते. यामध्ये राज्यातील विविध भागातील महिला बचत गटांचे स्टॉल असतात. त्यांच्या वस्तूंना आणि खाद्यपदार्थांना मुंबईची बाजारपेठ या निमित्ताने खुली करून दिली जाते. यंदाच्या प्रदर्शनाचे बुधवारी उदघाटन झाले. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, बचत गटांचे जाळे राज्यभर पोहोचवण्यात आम्हाला यश आले आहे. लोकल टू ग्लोबल या मोहिमेंअंतर्गत आम्ही आपले काम आंतरराष्ट्रीय बाजारात घेऊन गेलो. बचत गटाच्या चार महिलांना आम्ही अमेरिकेलाही नेले होते. ग्रामविकास मंत्री म्हणून मी यंदा शेवटचे या प्रदर्शनाचे उदघाटन करते आहे. निवडणुकीनंतर पुन्हा भाजपचीच सत्ता येईल, याची मला १०० टक्के खात्री आहे. पण माझ्याकडे काय जबाबदारी असेल, याची कल्पना नाही. मला कोणी विचारले तर मला पुन्हा ग्रामविकास मंत्री व्हायला आवडेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ऑक्टोबर २०१९ मध्ये राज्य सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप सरकार पुन्हा सत्तेत येणार का, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.