मुंबई : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नव्या झेंड्यात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा वापरल्यानं नवा वाद सुरू झाला आहे. मनसेच्या नवीन 'राजमुद्रा' छापलेल्या झेंड्याला संभाजी ब्रिगेडनं कडाडून विरोध केला आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी राजमुद्रेची निर्मिती केली. त्या राजमुद्रेचा वापर कुठल्याही पक्षांनी राजकारण करण्यासाठी करू नये, असं संभाजी ब्रिगेडचं म्हणणं आहे. याबाबत निवडणूक आयोग, छत्रपतींचे वंशज तसंच महाराष्ट्र सरकार यांच्याकडेही या झेंड्याविरोधात संभाजी ब्रिगेड तक्रार करणार आहे. एवढंच नव्हे तर राजमुद्रेचा असा वापर शिवप्रेमी सहन करणार नाहीत, असा इशाराही संभाजी ब्रिगेडनं दिला आहे.
आज मुंबईत मनसेचं राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. यासाठी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राज्यभरातून उपस्थित आहेत. राज ठाकरे कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. राज ठाकरे यांच्या पक्षाची नवी वाटचाल सुरु होत आहे. मनसेचा नवा झेंडा समोर आल्यानंतर मनसे हिंदुत्वाचा मुद्दा धरणार का ? अशी चर्चा सुरु झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला यामुळे एक वेगळं वळण मिळणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेनं महाविकासआघाडीशी घरोबा केल्यापासून राज्यात आक्रमक हिंदुत्वाची पोकळी भरुन काढण्याची मनसेसमोर चांगली संधी होती. अशा वेळी भगवं होण्याचं मनसेचं टायमिंग अचूक आहे. त्यातच अमित ठाकरे यांची देखील राजकारणात एन्ट्री झाली आहे. त्यांच्यासमोर अनेक राजकीय आव्हानं देखील असणार आहेत. आतापर्यंत भूमिपुत्राच्या हक्कासाठी लढणारी, परप्रांतीयांना विरोध करणारी मनसे आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुढे जाणार का हे पाहावं लागेल.