गोविंद तुपे, झी मीडिया, मुंबई : पुरोगामी म्हणवला जाणारा महाराष्ट्र काळ्या जादूच्या विळख्यात अडकलाय. राज्यात अनेक व्यापारी यात फसवले गेलेत. त्यांना लाखो-करोडोंचा गंडा घालण्यात आलाय. याच सगळ्याचा पर्दाफाश झी २४ तास इन्व्हेस्टीगेशनच्या ऑपरेशन तुम्बाडमध्ये करणार आहोत.
काय आहे ऑपरेशन तुंबाड
पैशाचा पाऊस पडतो, रक्कम दुप्पट करून देतो, जमिनीतील धनाची पेटी शोधून देतो, अशा भूलथापा देत तांत्रिक मांत्रिकांनी अनेकांना देशोधडीला लावलं आहे. याच बाबांच्या नादाला लागून पुण्यासारख्या उच्चशिक्षित शहरातील 7 नामांकित व्यावसायिक अक्षरश: बरबाद झाल्याची धक्क्कादायक माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
कसा उडतो हवेत लिंबू
लोकांना गंडवण्यासाठी हे तांत्रिक मांत्रिक बाबा अनेक चमत्कार करुन दाखवतात. बाबा मंत्र पुटपुटतो आणि लिंबू हवेत उडू लागतो, बाबा जे काही करून दाखवतोय ते पाहिल्यानंतर तुमचाच तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. एकढंच नव्हे तर या बाबाच्या आदेशानं हा लिंबू जमिनीवरही येतो.
काही जण दिव्य शक्तीच्या जोरावर कुठलाही स्पर्श न करता लिंबू हवेत उचलतात. संशयाला जागा मिळू नये म्हणून लिंबाभोवती हात आणि सायकलचा टायर फिरवून तो हवेत लिंबू लटकल्याची खात्रीही पटवून देतात.
दीडफुट्या हड्डी
झी 24 तासने केलेल्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये तर एका बाबाने तर त्याच्या जवळ असलेल्या हड्डीत जीनचा आत्मा असल्याचा दावा केला. ही साधीसुधी हड्डी नाही. तिच्या जवळ नेलेलं बंद केलेलं कोणतंही कुलूप उघडतं. काळ्या जादूच्या दुनियेत या दीड फुट्या हड्डीला हजार कोटींचा भाव आहे. इतकंच नाही तर त्याने स्वत:वर ब्लेडने सपासप वार केले, मात्र रक्ताची धार सोडाच रक्ताचा थेंबही पडला नाही.
नागमणीचा चमत्कार
यातला आणखी एक नमुना म्हणजे नागमणी. आतापर्यंत तुम्ही नागमणी सिनेमातच पाहिला असेल. पण आम्ही तुम्हाला केवळ नागमणीच नव्हे तर त्याचा चमत्कारही दाखवणार आहोत. हा नागमणी पाण्यात टाकला त्याची तडफड सुरू होते. हा नागमणी घरात ठेवला तर भरभराट होते असा तंत्र-मंत्राच्या विश्वात समज आहे. काळ्या जादूच्या बाजारात या नागमणीची किंमत काही कोटींच्या घरात आहे.
काळ्या हळदीला मागणी
तंत्रमंत्रच्या दुनिये काळ्या हळदीलाही मोठी मागणी आहे. या हळदीत औषधी गुणधर्म असले तरी बाजारात तिची किंमत काही कोटींच्या घरात आहे. ही हळद बंद कुलूप सहजपणे उघडते. कापूर जवळ नेते तर तो पेट घेतो. लोखंडी वस्तूही या हळदीसमोर सहजपणे वाकते.
दोन तोंड्या मांडुळाचा वापरही केला जातो. काळ्या जादूच्या दुनियेत त्याला डबल इंजिन म्हणून ओळखलं जातं. या सापामुळे पैशांचा पाऊस पडतो अशी धारणा धारणा आहे. त्यामुळे या डबल इंजिनचा भाव तब्बल 25 कोटींच्या घरात आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या दिव्य वस्तूंच्या चमत्कारांचे व्हिडिओ तुमच्या आमच्या मनोरंजनासाठी केले असतील. पण नाही, हा आहे गुप्तधन शोधण्यासाठी बाबा मंडळींनी सुरू केलेला नवा गोरखधंदा. आपल्यात दिव्यशक्ती असल्याचा दावा बाबा मंडळींसह काळी जादू प्रत्यक्षात पाहणारे करतायेत.
चमत्कारीक कारनामे हेच त्यांच्या धंद्याचं मूळ भांडवल आहे. या वस्तूंमुळे गुप्तधन सापडतं, जमिनीत पुरलेलं गुप्तधन तुमच्याकडे चालत येतं. पैशांचा पाऊस पडतो अशी बतावणी करत उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीयांना जाळ्यात ओढलं जातंय. आणि अनेकांना लाखो-करोडोंचा गंडा घातला जातोय.
ही काळीजादू वगैरे सारं थोतांड असल्याचा दावा अनिसनं केला आहे. हे चमत्कार वगैरे नसून या चमत्कारांचा पर्दाफाश करण्यासाठी सूक्ष्म निरीक्षणाची गरज असल्याचं अनिसचं म्हणणंय..
ह्या काळ्या जादूनं अनेकांना पछाडल्यामुळे पुरोगामी महाराष्ट्र अजूनही अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकल्याचं सिद्ध झालंय. झटपट पैसे कमावण्याच्या नादात अनेक मोठमोठी लोकं अशा काळ्या जादूला बळी पडतायेत. पण हे एवढ्यावरच थांबत नाही. झी 24 तासच्या हाती आणखीही धक्कादायक व्हिडिओ लागले आहेत. या काळ्या जादूच्या बाजारात कशी होते हजारो कोटींची डील? हा काळा बाजार पाहून तुमची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही