मुंबई: उद्धव ठाकरे हे शरद पवार सोडून इतर कोणाचंही ऐकत नाहीत. एरवी शरद पवार काय बोलतात हे कोणालाच कळत नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांना ते बरोबर समजते, अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते मंगळवारी भाजपच्या राज्यव्यापी अधिवेशनानिमित्त आझाद मैदानावर आयोजित केलेल्या सभेत बोलत होते.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे अजूनही चाचपडत आहेत. त्यांना गुंठा आणि हेक्टरमधील फरक कळत नाही. त्यांना फक्त मुंबईतील जमिनींचे भाव माहिती आहेत. त्यामुळे देवेंद्रजी तुम्ही तरी उद्धव ठाकरेंना समजावून सांगा, अशी खोचक टिप्पणी चंद्रकांत पाटील यांनी केली.
'या' गतीने कर्जमाफीसाठी ४६० महिने लागतील; फडणवीसांचा सरकारला टोला
तसेच उद्धव ठाकरे कोणाचेही म्हणणे ऐकून घेत नाहीत. आज मुख्यमंत्री विधानभवनातून पळून गेले. उद्धव ठाकरे फक्त शरद पवारांचं ऐकतात. शरद पवार काय बोलतात हे इतर कोणालाही कळत नाही. फक्त उद्धव ठाकरे यांनाच कळते, अशी टीका पाटील यांनी केली.
'सरकार आदित्य ठाकरेंच्या लग्नाच्या प्रस्तावालाही स्थगिती देईल'
मुंबईत सध्या राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात भाजप शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिला अत्याचाराच्या घटनांवरून सरकारला धारेवर धरले आहे. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी अब की बार बाप-बेटे की सरकार, अब की बार स्थगिती सरकार, अशा शब्दांत सरकारला लक्ष्य केले. तसेच उद्धव ठाकरे सरकार स्थगिती सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली. मागील सरकारच्या योजनांची चौकशी करण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला आव्हान दिले. कितीशी चौकशी केली तरी, काही सापडणार नाही, असा दावा मुनगंटीवार यांनी केला.