दीड लाखांचा सामोसा! मुंबईकर डॉक्टरची उडाली झोप; पिकनिकला जाण्याआधीच असं काही घडलं की...

Doctor Duped For 1.40 Lakh: पिकनिकला जाण्याच्या तयारीत असलेल्या या डॉक्टरने फोन करुन सामोश्यांची ऑर्डर दिली. मात्र पेमेंट ऑनलाइन करणार असल्याचं सांगितलं. पण हीच गोष्ट फारच महागात पडली आणि त्याला लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 11, 2023, 12:34 PM IST
दीड लाखांचा सामोसा! मुंबईकर डॉक्टरची उडाली झोप; पिकनिकला जाण्याआधीच असं काही घडलं की... title=
या प्रकरणामध्ये पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे

Doctor Duped For 1.40 Lakh: मुंबईमधील एका डॉक्टराला फोनवरुन सामोसे ऑर्डर करुन त्याचं पेमेंट ऑनलाइन माध्यमातून करणं फारच महागात पडलं आहे. या डॉक्टरने 25 प्लेट सामोसे मागवले होते. मात्र ऑनलाइन पेमेंट करण्याचा प्रयत्न केला असता या डॉक्टरला तब्बल 1 लाख 40 हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये डॉक्टरने भोईवाडा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.

फोन करुन दिली ऑर्डर पण...

हा सर्व प्रकार शीव येथे घडला. गंडा घालण्यात आलेला 27 वर्षीय डॉक्टर केईएम रुग्णालयामध्ये कार्यरत आहे. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास या डॉक्टरने फोनवरुन सामोसे ऑर्डर केले होते. मात्र 25 प्लेट सामोश्यांच्या नादात आपल्या खात्यावरील 1 लाख 40 हजार रुपये काही क्षणात गायब होतील असा विचारही या डॉक्टरने केला नव्हता. आपल्या मित्रांबरोबर शनिवार, रविवारी कर्जतला पिकनिकसाठी जाण्याचा या डॉक्टरचा प्लॅन होता. त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण ग्रुपच्या ब्रेकफास्टची जबाबदारी या डॉक्टरकडे देण्यात आल्याने त्याने गुरूकृपा रेस्तराँमध्ये फोन करुन 25 प्लेट सामोसे मागवले होते. या सामोश्यांचं बील 1500 रुपये झालं असून ते ऑनलाइन माध्यमातूनच द्यावं असं या डॉक्टरला सांगण्यात आलं. 

दुसरी लिंक आली पण...

या डॉक्टरने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर 1500 रुपये पाठवले. त्यानंतर डॉक्टरला समोरुन पुन्हा फोन आला. तुमचं पेमेंट झालेलं नाही असं समोरच्या व्यक्तीने सांगितलं. दुसऱ्या क्रमांकावरुन तुम्ही आमची पेमेंट रिक्वेस्ट स्वीकार करा आणि त्याच क्रमांकावर पेमेंट करा असं या डॉक्टरला सांगण्यात आलं. फोन ठेवल्यानंतर या डॉक्टरच्या क्रमांकावर एक लिंक पाठवण्यात आली. डॉक्टरने पेमेंट करण्यासाठी या लिंकवर क्लिक करुन माहिती भरत असतानाच अचानक खात्यावरुन 28 हजार रुपये कट झाल्याचा मेसेज आला. 

3 मेसेज अन् अकाऊंट बॅलेन्स झीरो

हे पाहून डॉक्टरला धक्का बसला. कारण केवळ 1500 हजाराचं पेमेंट करणं अपेक्षित असताना खात्यावरुन 28 हजार कसे गेले असा प्रश्न डॉक्टरला पडला. त्यानंतर एकामागोमाग एक 3 मेसेज या डॉक्टरला आले. या मेसेजमध्ये वेगवेगळी रक्कम खात्यावर वळवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. डॉक्टरच्या खात्यावरील सर्व पैसे म्हणजेच 1 लाख 40 हजार रुपये वळवण्यात आल्याचं स्पष्ट झालं. यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर या डॉक्टरने आपलं खातं ब्लॉक केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.