मुंबई : बिकेसी पोलिसांनी ओएलएक्सवर गाडी विकत घेण्याच्या बहाण्याने गाडी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. यावेळी पोलिसांनी अयाज सय्यद आणि आरीफ सय्यद नावाच्या दोघांना अटक करत ८ आलीशान गाड्या जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये बि. एम. डब्लू. होंडा सिव्हीक, ईन्होव्हा सारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे. सुरवातीला ही टोळी ओएलएक्सवर गाडी हेरत असे. जी गाडी यांना पसंत पडत असे त्याच्या मालकाशी हे सौदा करत गाडीची टेस्ट ड्राईव्ह देखील घेत असत. गाडी पसंत पडताच हे मालकाला पैसे एन. ई . एफ. टी करत असत. पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील ते गाडीच्या मालकाला दाखवत आणि त्यानंतर गाडीची कागदपत्रे आणि गाडी घेऊन पसार होत असत.
गाडीचा मालक पैसे मिळाल्याच्या संभ्रमात असे प्रत्यक्षात मात्र हा मेसेज खोटा असे आणि मालकाच्या खात्यात काहीच जमा होत नसे. मालकाला फसवणूकीच समजे पर्यंत उशीर झालेला असे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बिकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल होताच बीकेसी पोलिसांनी या दोघांच्या मुसक्या आवळल्या.