मुंबईतील रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन सेवा

एक-दोन तासांत बेड उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा दावा

Updated: May 28, 2020, 12:51 PM IST
मुंबईतील रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन सेवा title=

कृष्णात पाटील, मुंबई : रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याच्या वाढत्या तक्रारींनंतर आता मुंबई महापालिकेने डॅश बोर्ड तयार केला असून रुग्णांनी थेट हॉस्पिटलला जाण्याऐवजी महापालिकेने दिलेल्या नंबरवर फोन करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. त्यामुळे रुग्णांना आता एक ते दोन तासांत बेड उपलब्ध करून दिले जात असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

मुंबईत डॉक्टरांची कमतरता जाणवत असल्याने आता महापालिकेने राज्याच्या ग्रीन झोनमधून डॉक्टर मागवण्याची तयारी सुरु केली आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली आहे.

रुग्णांना आता ऑनलाईन माहिती

मुंबईत रुग्णालयांमध्ये रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत, अशा तक्रारी वाढल्या होत्या. रुग्णांना वेगवेगळ्या रुग्णालयांचे उंबरठे झिजवूनही बेड उपलब्ध न झाल्यामुळे रुग्णांना मनस्ताप आणि त्रासही सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिकेने आता डॅशबोर्ड तयार केला आहे. रुग्णांनी आता थेट रुग्णालयांत न जाता १९१६ या क्रमांकावर कॉल करावा. तिथे डॅशबोर्डवर नोंद झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने एक ते दोन तासांत बेड उपलब्ध करून दिले जात आहेत, असं महापालिकेनं म्हटलं आहे.

कोविड रुग्णांसाठी जास्तित जास्त बेड तयार केले जात असून त्यापैकी ५० टक्के बेड ऑक्सिजनचे असतील यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. तसेच लक्षणं नसलेल्या कोविड रुग्णांनी घरी वेगळी व्यवस्था असेल तर घरीच राहावे. त्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे. ज्यांच्या घरी व्यवस्था आहे, त्यांच्यावर घरीच उपचार केले जात आहेत.

डॉक्टरांची कमतरता

मुंबईत डॉक्टर आणि अन्य प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवू लागली आहे. त्यासाठी कोविड योद्धा भरती केली जाणार आहे. याशिवाय केरळमधून डॉक्टर आणि नर्स आणण्याचाही विचार राज्य सरकारने केला आहे. याशिवाय राज्याच्या ग्रीन झोनमधील डॉक्टरांनाही मुंबईत आणण्यासाठी तयारी महापालिकेने सुरु केली आहे. तसेच डॉक्टरांची भरतीही सुरु केली आहे.

 

मुंबईत राज्यातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून कोविंड सेंटर्स उभारून अधिकाधिक खाटा उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.