राहुल गांधींची आदित्य ठाकरेंशी चर्चा; मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी दिला 'हा' सल्ला

राहुल गांधी यांनी महाराष्ट्र सरकारचे कौतुकही केले.

Updated: May 28, 2020, 12:11 PM IST
राहुल गांधींची आदित्य ठाकरेंशी चर्चा; मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी दिला 'हा' सल्ला title=

मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेसला मोठे निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत, या राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. यावेळी त्यांनी काँग्रेसला निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले. यानंतर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी बुधवारी संयुक्त पत्रकारपरिषद घेत महाविकासआघाडी भक्कम असल्याचा संदेशही दिला होता. 

३१ मे नंतरही लॉकडाऊन उठवणार नाही, उद्धव ठाकरेंचे संकेत

त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिष्टाई तुर्तास यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. मात्र, या दरम्यान राहुल गांधी यांनी केवळ उद्धव ठाकरे नव्हे तर आदित्य यांच्याशीही चर्चा केल्याचे समजते. महाराष्ट्र कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी चांगल्याप्रकारे काम करत असल्याचे राहुल यांनी आदित्य ठाकरेंना सांगितले. तर आदित्य यांनी महाराष्ट्रात लॉकडाऊन आणि इतर योजनांची अंमलबजावणी कशाप्रकारे सुरु आहे, याविषयी राहुल गांधींना माहितीही दिली.

'खरं बोलायला एक, फेकफाक करायला ३ माणसं,' फडणवीसांचा महाविकासआघाडीला टोला

यावेळी राहुल गांधी यांनी मुंबईत कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आदित्य यांना एक सल्ला दिला. मुंबईतील लोकसंख्या प्रचंड आहे. त्यामुळे याठिकाणी कोरोनाग्रस्तांचा वाढणारा आकडा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवायचे असेल तर स्क्रीनिंग आणि टेस्टिंगची संख्या वाढवा, असे राहुल गांधी यांनी आदित्य ठाकरेंना सांगितले. गेल्या काही दिवसांत राहुल गांधी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक तज्ज्ञांशी संवाद साधला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचा हा सल्ला महाराष्ट्राला फायदेशीर ठरू शकतो.