भाजपसोबत युती कधीही नाही, महाविकास आघाडी भक्कम - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह विरोधी पक्ष भाजपविरोधात एकवटले आहेत. ही एकजूट कायम राहिल अशा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला आहे. 

Updated: Apr 11, 2023, 03:54 PM IST
भाजपसोबत युती कधीही नाही, महाविकास आघाडी भक्कम - उद्धव ठाकरे title=

Uddhav Thackeray : भाजपसोबत युती करणार नाही अशी ठाम भूमिका उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलीय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह विरोधी पक्ष भाजपविरोधात एकवटले आहेत. ही एकजूट कायम राहिल अशा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला आहे. पंतप्रधानपदाबाबतचा निर्णय विरोधकांच्या बैठकीतच होईल, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच 2024 मध्येही आपल्याला मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा नसून महाविकास आघाडीचे नेते योग्य निर्णय घेतील असा विश्वासही ठाकरेंनी व्यक्त केला आहे. 

भाजपने शिवसेना फोडण्यास मोठी भूमिका बजावली. याबाबत शिंदे गटातील नेत्यांनी तसेच भाजपच्या काही नेत्यांनी याबाबत जाहीर वक्तव्य केले आहे. नऊ महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडत बंड केले. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत मिळून सत्तास्थापन केली. आता शिंदे-फडणवीस यांचे सरकार राज्यात आहे.

शिवसेना-भाजपची  युती तुटल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रचंड मतभेद निर्माण झाले आहेत. एकमेकांवर जोरदार तोंडसुख घेण्यात येत आहे. त्यानंतर 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आघाडी करुन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे हे सरकार कोसळले. त्यानंतर मिंधे गट अशी ठाकरे गटाकडून टीका करण्यात येत आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होत आहे. पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाला. त्यामुळे यापुढेही महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढविण्याचे संकेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडून देण्यात आले आहेत. सध्या महाविकास आघाडीकडून 'वज्रमूठ'च्या नावाखाली राज्यात जाहीर सभा घेण्यात येत आहेत. दोन सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

आगामी महिन्यांत महाविकास आघाडीच्या राज्यातील प्रमुख शहरांमध्ये जाहीर सभा घेणार आहे. या सभांचा कार्यक्रम नुकताच घोषित करण्यात आला. या सभांना  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , राष्ट्रवादीचे नेते अजित पवार , काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सभांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि इतर नियोजन करण्यासाठी महाविकास आघाडी नेत्यांची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरला महत्वाची बैठक पार पडली. याच बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आगामी काळ हा महाविकास आघाडीचा आहे, असे म्हटलेय.