BMC BJP Mayor : मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार, नड्डा यांचा दावा

BMC BJP Mayor : मुंबई आलेले भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महापालिका निवडणूक तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी चर्चा केली. भाजपने महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.  

सुरेंद्र गांगण | Updated: May 18, 2023, 08:19 AM IST
BMC BJP Mayor : मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार, नड्डा यांचा दावा title=

BMC BJP Mayor : मुंबई महानगरपालिकेत भाजपचाच महापौर बसणार, असा दावा मुंबई दौऱ्यावर आलेल्या भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला आहे. त्यांनी यावेळी महापालिका निवडणूक तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी चर्चा केली. भाजपने महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. भाजपचे  अध्यक्ष जे.पी.नड्डा हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा मानला जात आहे.

मुंबई महापालिकेत ठाकरे गटाची सत्ता आहे. या सत्तेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजप आणि एकनाथ शिंदे करण्यासाठी तयारी करत आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने देखील भाजप रणनीती आखत आहे. यातच जे.पी.नड्डा मुंबईत दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी काल भाजपा मोर्चा आघाडीची बैठक घेतली आहे. या बैठकीत त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने तयारीला सज्ज व्हा, असा संदेश दिला आहे. पुढील महापौर हा भाजपचा असला पाहिजे, असे स्पष्ट बजावले आहे. तसेच याबाबत त्यांनी स्पष्ट सांगितले की, पुढील महापौर हा भाजपचाच असेल.

यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आपल्याबरोबर इतरांना जोडण्याचं काम केले पाहिजे. तसे आदेश दिलेत. तुमच्या परिसरातील लोकांना भेटा आणि सरकार कसे चांगले काम करत आहेत, हे सांगून ते सरकारचे काम जनतेपर्यंत पोहचवा, असे आदेश दिलेत. 

भाजपची आज पुण्यात 'पंचतारांकित' बैठक

दरम्यान, भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुण्यात होत आहे. या बैठकीसाठी वरिष्ठ नेत्यांची विशेष बडदास्त ठेवण्यात आली आहे. भाजपकडून शहरातील प्रमुख पंचतारांकित हॉटेलमधील खोल्या निश्चित करण्यात आल्या आहेत. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत होणारी ही बैठक 'पंचतारांकित' ठरणार आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असून, निवडणुकीची रणनीती या बैठकीत निश्चित केली जाणार आहे. जे. पी. नड्डा उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील खासदार, केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसह विविध आघाडीचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

राज्यातील राजकीय परिस्थिती, आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्यादृष्टीने या बैठकीत चिंतन होणार आहे. तसेच राजकीय ठरावही केले जाणार आहेत. बैठकीसाठी राज्यातून 1200 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पुण्यातील आजच्या बैठकीकडे लक्ष लागले आहे.