मुंबई : राज्यात काही प्रमुख मार्गावर एसटीचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. कारण एसटीच्या ताफ्यात नव्या स्लीपर गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आता अधिकच आरामदायी होणार आहे. आसन, शयनयान अशी दोन्ही सुविधा असलेल्या नव्या कोऱ्या २० बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.
या नव्या आरामदायी गाड्या मुंबईहून सूटणार आहेत. मुंबईकडे येणाऱ्या रातराणीच्या जागी या एसटी धावणार आहेत. सध्या २० गाड्या एसटी महामंडळात दाखल झाल्या आहेत. या गाड्या राज्य महामंडळाच्या मालकीच्या आहेत. एकूण २०० गाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. डिसेंबर २०१९ अखेर प्रवाशांना या नव्या गाड्यांतून प्रत्यक्ष प्रवासाचा लाभ घेता येणार आहे.
या २०० गाड्या बांधण्यात येणार आहे. पुणे येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्टच्या (सीआयआरटी) मंजुरीनंतर २० नवीन गाड्यांचा महामंडळाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला आहे. परळ-कोल्हापूर (पारगड), परळ-कोल्हापूर (पाटगाव), मुंबई सेंट्रल-बुलढाणा, मुंबई सेंट्रल-सांगली, मुंबई सेंट्रल-अंमळनेर या मार्गावरील रातराणीच्या जागी गाड्या धावण्याची शक्यता आहे.