Tata Airbus : "मुख्यमंत्र्यांनी जनतेला सत्य सांगावे"; उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंची मागणी

अतिशय महत्वाच्या मुद्याबाबत सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या

Updated: Oct 29, 2022, 11:37 AM IST
Tata Airbus : "मुख्यमंत्र्यांनी जनतेला सत्य सांगावे"; उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंची मागणी title=

मुंबई : वेदांता- फॉक्सकॉन (Vedanta-Foxconn), बल्क ड्रग्ज पार्क (Bulk Drug Park) आणि मेडिसीन डिव्हाईस पार्क (Medical Device Park) पाठोपाठ आता नागपुरात होऊ घातलेला टाटा एअरबसचा (Tata Airbus Project) 22 हजार कोटींचा संरक्षण सामग्रीचा प्रकल्पही गुजरातला गेलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. यावरुन आता राज्यात राजकारण मोठ्या प्रमाणात तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यासाठी एकमेकांना दोषी ठरवत आहेत. अशातच उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samnat) यांनी मांडलेल्या भूमिकेवरुन  राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना सत्य सांगण्याची, मागणी केलीये. (ncp Supriya Sule demand on Tata Airbus project to CM Eknath Shinde)

"राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असणारे तीन मोठे प्रकल्प या सरकारच्या डोळ्यांदेखत गुजरातला गेले आहेत. नागपूरला होऊ घातलेला टाटा एअर बसचा सुमारे 21 हजार 935 कोटी रुपयांची गुंतवणूक असणारा प्रकल्प वडोदरा येथे गेला. या प्रकल्पाच्या माध्यमातून 6 हजार जणांना रोजगार मिळणार होते. काही दिवसांपुर्वीच वेदांत फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्प देखील गुजरातला गेला. हा अगोदर पुणे जिल्ह्यातील चाकण येथे होणार होता. सुमारे 1.54 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पात होती. राज्यातील सुमारे दीड लाख लोकांना यामुळे रोजगार उपलब्ध होणार होता. याखेरीज रायगड जिल्ह्यात होऊ घातलेला बल्क ड्रग पार्क हा सुमारे पावणेतीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असणारा प्रकल्प देखील गुजरातला गेला. या प्रकल्पातून राज्यातील 80 हजार तरुणांना नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या. याशिवाय राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल देखील मिळणार होता. हे असे एकामागून एक महत्वाचे प्रकल्प गुजरातला जात असताना याच सरकारमधले मंत्री महोदय सातत्याने परस्परविरोधी विधाने करीत आहेत," असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

"टाटा एअरबस प्रकल्पाबाबत काही दिवसांपुर्वी ते म्हणाले की माननीय उपमुख्यमंत्री हा प्रकल्प राज्यात थांबविण्यात कमी पडले. त्यानंतर तेच मंत्रीमहोदय हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारमुळे एक वर्ष आधीच हा राज्याबाहेर गेल्याचे सांगतात. एका वाहिनीवर महिनाभरापुर्वी हेच मंत्री हा प्रकल्प नागपुरात होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं सांगत होते. थोडक्यात अतिशय महत्वाच्या या मुद्याबाबत सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. राज्याच्या हिताच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा व तरुणांसाठी रोजगारनिर्मिती करणारा हा प्रकल्प गुजरातला कसे गेला याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका ठामपणे स्पष्ट करण्याची गरज आहे. माझी त्यांना नम्र विनंती आहे की, कृपया आपण याबाबतीत जी काही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्याबाबत जनतेला सत्य काय ते सांगावे," असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान,  हा प्रकल्प गुजरातला जाण्याचं उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आधीच्या ठाकरे सरकारवर फोडलंय. ठाकरे सरकारच्या काळातच हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप सामंतांनी केलाय. पुढच्या वर्षी आणखी मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणू असं आश्वासन सामंत यांनी पुन्हा दिलय.