'जबाबदार लोकप्रतिनिधी असल्याने...'; ट्रिपल वसुलीचा आरोप करणाऱ्या अमोल कोल्हेंना मुंबई पोलिसांचे प्रत्युत्तर

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन मुंबईतील वाहतूक पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. त्यावर आता मुंबई वाहतूक पोलिसांनी अमोल कोल्हेंना प्रत्युत्तर दिलं आहे. 

आकाश नेटके | Updated: Dec 3, 2023, 08:20 AM IST
'जबाबदार लोकप्रतिनिधी असल्याने...'; ट्रिपल वसुलीचा आरोप करणाऱ्या अमोल कोल्हेंना मुंबई पोलिसांचे प्रत्युत्तर title=

Mumbai News : मुंबईत वाहतूक पोलिसांच्या कारवाईवरुन सातत्याने टीका केली जाते. अशातच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी गंभीर आरोप केले आहेत. बईमध्ये वाहतूक पोलिसांना वसुलीचे टार्गेट देण्यात आले आहे. त्याबाबतचा मेसेज वाहतूक पोलिसांना पाठवण्यात आल्याचे अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. अमोल कोल्हे यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही पोस्ट केला आहे. अमोल कोल्हे यांच्या आरोपांची गंभीर दखल घेत मुंबई वाहतूक पोलिसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

काय म्हटलं अमोल कोल्हेंनी?

"मुंबईतून बाहेर पडत असताना एक धक्कादायक अनुभव आला. एका सिग्नलला वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यांनी जो काही ऑनलाईन दंड आहे तो भरला पाहिजे अशी मागणी केली. हा काय प्रकार आहे याची चौकशी केली. वाहतूक शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांचा आदर आहे. पण चौकशी केल्यावर महिला कर्मचाऱ्याने मला मेसेज दाखवला. हा मेसेज धक्कादायक होता. यामध्ये प्रत्येक चौकात 25 हजारांची वसूली व्हायला हवी आणि 20 गाड्यांवर कारवाई व्हायला हवी असे म्हटलं होतं. एकूण आकडा पाहिला तर खूपच धक्कादायक वास्तव समोर येत आहे. आताचे ट्रिपल इंजिन सरकार वसुलीसाठी वापर करत असेल तर आमच्या ज्ञानात याने भर पडेल. अशा पद्धतीने टार्गेट देऊन वसुली केली जात असेल तर खेदाने म्हणावे लागेल की ट्रिपल वसुली सुरु आहे," असे अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

"आजचा धक्कादायक अनुभव- मुंबईत सिग्नल्स वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः काय प्रकार आहे याची माहिती घेताना त्या भगिनीने थेट मोबाईलवरील मेसेज दाखवला- प्रत्येक चौकात 25000 रूपयांची वसुली व 20 वाहनांवर कारवाई झाली पाहिजे!  मुंबईत 652 ट्रॅफिक जंक्शन आहेत. 25,000×652 = 1,63,00,000/ प्रति दिन म्हणजे फक्त एकट्या मुंबईत तब्बल 1.63 कोटी रुपये.. इतर शहरांचं काय? संबंधित मंत्रीमहोदयांनी वा अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यास वाहतूक शाखेचा उपयोग वाहतूक नियमनापेक्षा वसुलीसाठी होतोय का याची जनतेला माहिती मिळेल! ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली???," अशी पोस्ट खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांचे प्रत्युत्तर

"महोदय, मुंबई शहरात मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केलेल्या 1.31 कोटींपेक्षा अधिक ई-चालानधील 685 कोटी रूपयांपेक्षा अधिक दंडाची रक्कम 1 जानेवारी 2019 पासुन प्रलंबित आहे. ही दंडनीय रक्कम शासनजमा करण्यासाठी व वाहतुकीच्या नियंमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांमधे वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी शनिवार व रविवार या दिवशी दंड वसुलीची मोहिम हाती घेण्यात येते. अशा प्रकारचा संभ्रम निर्माण करणारा संदेश समाजमाध्यमावर प्रसारीत करण्यापुर्वी आपण जबाबदार लोकप्रतिनिधी असल्याने पर्यवेक्षिय अधिकाऱ्यांकडुन वस्तुस्थितीची माहिती घेऊन आपण संदेश प्रसारित करणे अपेक्षित होते," असे प्रत्युत्तर मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलं आहे.