रोहित पवार लालबागमध्ये; खातूंच्या गणपती कार्यशाळेला दिली भेट

काही दिवसांपूर्वी आग लागल्यामुळे खातूंच्या कारखान्याचे नुकसान झाले होते.

Updated: Jun 5, 2020, 11:01 AM IST
रोहित पवार लालबागमध्ये; खातूंच्या गणपती कार्यशाळेला दिली भेट title=

मुंबई: राज्य सरकारच्या मिशन बिगिन अगेनच्या दुसऱ्या टप्प्यातंर्गत शुक्रवारपासून अनेक व्यवहार पुन्हा सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हेदेखील सक्रिय झाले आहेत. त्यांनी लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर थेट लालबाग गाठत सुप्रसिद्ध मूर्तीकार विजय खातू यांच्या गणेश कार्यशाळेला भेट दिली. याची काही छायाचित्रे त्यांनी ट्विटरवर शेअर केली आहेत.
 
काही दिवसांपूर्वी आग लागल्यामुळे खातूंच्या कारखान्याचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी आज कारखान्याची पाहणी केली. खातू यांच्या कन्या रेशमा खातू आणि अन्य कर्मचाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. 'लालबागच्या राजा'ची मूर्ती साकारणारे मूर्तीकार म्हणून खातूंच्या कार्यशाळेचा लौकिक आहे. त्यामुळे आता राज्य सरकार लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या गणेश कार्यशाळांना काही मदत करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

'परळचा राजा' गणेशोत्सव मंडळाचा मोठा निर्णय; यंदा २३ फुटांऐवजी फक्त तीन फुटांची मूर्ती

यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. आतापर्यंत मुंबईतील काही सार्वजनिक मंडळांनी उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काही मंडळांनी यंदा 'श्रीं'च्या मूर्तीची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाला आता अवघे दोन महिने शिल्लक आहेत. एव्हाना गणपती कारखान्यांमधील कामाला वेग येतो. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार थंडावले आहेत. तरीही गणेशमूर्तीकारांनी प्रतिवर्षीप्रमाणे तयारी सुरू केली आहे.