राणे भाजपमध्ये गेले तर राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा

काँग्रेसचे नेते नारायण राणे भाजपमध्ये गेले तर काँग्रेसला डबल धक्का बसण्याची शक्यता आहे.

Updated: Aug 21, 2017, 05:12 PM IST
राणे भाजपमध्ये गेले तर राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा title=

दीपक भातुसे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : काँग्रेसचे नेते नारायण राणे भाजपमध्ये गेले तर काँग्रेसला डबल धक्का बसण्याची शक्यता आहे. नारायण राणे भाजपमध्ये गेले तर त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा आमदार नितेश राणे आणि राणेंचे समर्थक आमदार कालीदास कोळंबकरही भाजपमध्ये प्रवेश करतील.

नितेश राणे आणि कोळंबकरांनी पक्ष सोडला तर काँग्रेसचं विधानसभेतलं संख्याबळ ४२ वरून ४० येईल तर राष्ट्रवादीकडे ४१ आमदार असतील. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसपेक्षा जास्त संख्याबळ असलेला राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदावर दावा करेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील हे विरोधी पक्षनेतेपदाचे उमेदवारी असतील अशीही माहिती आहे.  

मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यात राणेंच्या भाजप प्रवेशाचा मुहुर्त ठरण्याचे संकेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या दिल्ली दौऱ्यात नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचा मूहुर्त निश्चित होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं आणि अमित शाह यांनी भाजपशासित राज्यांच्या मुख्यंमत्र्यांची सीएम कॉन्फरन्स बोलावली आहे. या बैठकीआधी अमित शाहा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात नारायण राणेंच्या प्रवेशासंदर्भात चर्चा होईल असं सूत्रांचं म्हणणं आहे.

यानंतर उद्या नारायण राणेही स्वतः दिल्लीत जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. अमित शाह आणि फडणवीस यांच्या चर्चेत राणेंच्या मंत्रिपदाचाही निर्णय होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राणेंच्या भाजप प्रवेशावरुन चर्चा सुरु आहे. पण राणेंच्या प्रवेशाला आणखी मूहुर्त मिळालेला नाही.