उपमुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटला, राष्ट्रवादीचे जयंत पाटील घेणार शपथ

महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे.  

Updated: Nov 28, 2019, 08:03 AM IST
 उपमुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटला, राष्ट्रवादीचे जयंत पाटील घेणार शपथ title=
संग्रहित छाया

मुंबई : आज नव्या सरकारचा आज शपथविधी सोहळा होणार आहे. उद्धव ठाकरे हे आज शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवतिर्थ अर्थात शिवाजी पार्कवर हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी शिवाजी पार्कवर जय्यात तयारी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांचं नाव निश्चित झाले आहे. 

आजच जयंत पाटील यांचा शपथविधी  होणार आहे. उपमुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादीच्या वाट्याला आले आहे. यासाठी सुरुवातीपासूनच अजित पवारांचे नाव चर्चेत होते. मात्र अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे ते बॅकफूटवर गेले आणि त्यांच्या जागी आता जयंत पाटलांची वर्णी लागली आहे. आता अजित पवारांकडे कोणती जबाबदारी पडणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर महाराष्ट्र विकासआघाडीच्या तिन्ही पक्षांकडून शिक्कामोर्तब झाले होते. उपमुख्यमंत्रीपदाचा घोळ कायम होता. उद्धव ठाकरे सरकारमध्ये एकच उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसकडून असेल, हे स्पष्ट करण्यात आले होते. तरी हा उपमुख्यमंत्री कोण असेल, हे कोडे मात्र अद्याप सुटलेले नव्हते. रात्री ते कोडे सुटले.

उपमुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीकडून कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे उत्सुकता कायम होती. अजित पवार आणि जयंत पाटील या दोघांमध्ये उपमुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू होता. रात्री उशिरा होणाऱ्या बैठकीत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून हे नाव निश्चित होईल, असे सांगितले जात होते. दरम्यान, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असे स्पष्ट केले.