कोश्यारी, चंद्रकांत पाटलांनी माफी तरी मागितली होती का?- जितेंद्र आव्हाड

NCP Jitendra Avhad: कोश्यारींनी, चंद्रकांत पाटलांनी माफी मागितली होती का? असा प्रतिप्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 

Pravin Dabholkar | Updated: May 30, 2024, 01:53 PM IST
कोश्यारी, चंद्रकांत पाटलांनी माफी तरी मागितली होती का?- जितेंद्र आव्हाड title=
Jitendra Avhad on Koshyari

NCP Jitendra Avhad:कोश्यारींनी, चंद्रकांत पाटलांनी माफी मागितली होती का? असा प्रतिप्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यात येणार असल्याच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून निषेध करण्यात आला. यापार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम घेतला. मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं. यानंतर विरोधकांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका केली. त्यावेळी आव्हाडांनी विरोधकांना प्रतिप्रश्न केला.

हा प्रकार अनावधानाने झाल्याचं सांगत आव्हाड यांनी माफी मागितली होती.  असे असतानाही भाजपने हा मुद्दा लावून धरल्याने आव्हाड चांगलेच संतापले आहेत. कोश्यारी जेव्हा महात्मा फुलेंबद्दल बोलले तेव्हा त्यांनी माफी मागितली का? तेव्हा कोण भाजपवाले गेले नाहीत. चंद्रकांत पाटलांनी छत्रपतींबद्दल विधान केलं तेव्हा माफी मागितली का? असा प्रश्न त्यांनी विचारला. 

मी काल गेल्यावर मला खरा इतिहास कळला. ज्या कुटुंबानी बाबासाहेब आंबेडकरांना पाठींबा दिला तेव्हा सनातन्यांनी त्यांच्या घरांवर 10 वर्षे बहिष्कार घातला. 

बाबासाहेब जेव्हा रायगडावर गेले तेव्हा तिथल्या सनातन्यांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. तिथे याचे साक्षीदार आहेत. मनुस्मृती जाळणार हे कळल्यावर सनातन्यांनी दम देत जागा देऊ नका असे धमकावले. 

जागा देणाऱ्या मुस्लिम व्यक्तीलाही त्यांनी विरोध केला. 97 वर्षांनी त्याच जागी मनुस्मृती जाळली गेली. त्यावेळी आमच्यकडून चूक झाली. गुन्हा दाखल झाला. मला फाशी द्या. मी मनुस्मृतीविरोधात जाणार. स्त्रियांना जगण्याचाच अधिकार नाही, असंच मनुस्मृतीत लिहिलंय. 

छगन भुजबळ, जयंत पाटील,सुषमा अंधारे, दीपक केदारे हे म्हणतायत त्यांचा उद्देश काय आहे तो बघा. 185 किमी दूर जाऊ फोटो फाडायला मी मूर्ख आहे का? आम्हाला याच वाईट वाटतंय. गुन्ह्यांना घाबरुन दूर जाणारे आम्ही कार्यकर्ते नाहीत, असेही ते म्हणाले. 

बहुजनांची समाज व्यवस्था ज्यांना व्यवस्थित समजते ते भुजबळ साहेब माझ्यासोबत आहेत. बाकीच्यांच्या प्रतिक्रियांशी मला काही देणंघेणं नाही. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या विरोध महाड पोलीस स्थानकात 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.