मुंबई : भाजप आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुली पळून आणण्याच्या वक्तव्याबद्दल राम कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला नाही तर महिला आत्मदहन करतील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि आमदार विद्या चव्हाण यांनी दिला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी घाटकोपर पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. मात्र पोलीस गुन्हा दाखल करत नसल्यानं त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
भाजप आमदार राम कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या राज्यभरात त्यांच्याविरोधात संतापाचं वातावरण आहे. तिकडे राज्यभरात राम कदमाच्या वक्तव्यावरून आंदोलनं निदर्शनं सुरू असताना भाजपचं नेतृत्व मात्र त्यांच्या आमदाराच्या पाठिशी ठाम पणे उभं राहताना दिसंत आहे.
कदमांच्याविरोधात रान पेटलंल्यावर तीन दिवसांनंतर त्यांनी माफी मागितली होती. दुसरीकडे बुलढाण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी राम कदम यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आमदार राम कदम यांची जीभ छाटून आणा आणि ५ लाख घेऊन जा असे आवाहन केल्याने एकच खळबळ उडाली आहे.