तलवारीची भाषा आता जुनी झाली; भुजबळांचा राज ठाकरेंना चिमटा

आपल्याकडे लोकशाही आहे. तसेच तलवार वैगेर काढण्याची भाषा जुनी झाली.

Updated: Feb 9, 2020, 08:51 PM IST
तलवारीची भाषा आता जुनी झाली; भुजबळांचा राज ठाकरेंना चिमटा title=

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) मोर्चे काढणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला. आज आम्ही मोर्च्याला फक्त मोर्चा काढून प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, यापुढे जास्त नाटकं कराल तर दगडला दगडाने आणि तलवारीला तलवारीने प्रत्युत्तर देऊ, असे राज ठाकरे यांनी म्हटले. 

साहजिकच राजकीय वर्तुळात राज यांच्या विधानाचे पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी या वक्तव्यावरून राज यांना चिमटा काढला. आपल्याकडे लोकशाही आहे. तसेच तलवार वैगेर काढण्याची भाषा जुनी झाली. आता फार नवीन शस्त्रे आली आहेत, असे भुजबळ यांनी म्हटले. 

'आता फक्त मोर्चा काढलाय.... यापुढे तलवारीला तलवारीनेच उत्तर देऊ'

तसेच राज ठाकरे यांच्या नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (NRC) समर्थन देण्याच्या भूमिकेवरही त्यांनी भाष्य केले. CAA आणि NRC संदर्भात कोण कोणाला पाठिंबा देईल किंवा विरोध करेल, हा मुद्दा वेगळा आहे. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात NRC लागू करू देणार नाही, हे स्पष्ट केले आहे. 

मोर्चे काढून कोणाला ताकद दाखवताय; राज ठाकरेंचा मुस्लिमांना सवाल

परंतु, बांगलादेशी नागरिकांना देशाबाहेर काढण्याच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेचे मी समर्थन करत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. मी राज्याचा गृहमंत्री असताना तेव्हाही ही समस्या होती. पोलीस बांगलादेशी घुसखोरांना सीमारेषेवर सोडून येतात. मात्र, हे लोक पुन्हा भारतामध्ये येतात. त्यामुळे या घुसखोरांना रोखणे, हे केंद्र सरकारचे काम आहे. त्यासाठी वेळ पडल्यास सरकारने बांगलादेशची सीमा बंद करावी किंवा आणखी काही उपाय करावा, असे भुजबळ यांनी सांगितले.