मनसेच्या मोर्चात हिंदी देशभक्तीपर गाणी

मनसेचे हे बदललेले रूप पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. 

Updated: Feb 9, 2020, 05:38 PM IST
मनसेच्या मोर्चात हिंदी देशभक्तीपर गाणी title=

मुंबई: पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना देशातून हुसकावून लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) रविवारी मुंबईत मोर्चा काढण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. गिरगावातील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान या मार्गावर काढण्यात आलेल्या या मोर्चाला राज्यभरातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. 

हा मोर्चा आझाद मैदानात पोहोचल्यानंतर वेगळाच माहोल पाहायला मिळाला. आतापर्यंत मनसेच्या कार्यक्रमांमध्ये नेहमी मराठीचा आग्रह धरला जात असे. मात्र, आज पहिल्यांदाच मनसेच्या कार्यक्रमात हिंदी देशभक्तीपर गाणी ऐकायला मिळाली. मनसेचे हे बदललेले रूप पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. 

मात्र, मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी आगामी काळात हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन वाटचाल करण्याचे संकेत दिल्यानंतर पक्षात असे बदल पाहायला मिळतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्याचीच चुणूक आझाद मैदानावारील मनसेच्या मोर्चावेळी पाहायला मिळाली. 

'आता फक्त मोर्चा काढलाय.... यापुढे तलवारीला तलवारीनेच उत्तर देऊ'

दरम्यान, आजच्या मोर्च्यानंतर राज ठाकरे यांनी आझाद मैदानावर कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी राज ठाकरे यांनी नागरिकत्व सुधारण कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीचे  (NRC)जोरदार समर्थन केले. हे दोन्ही कायदे काळाची गरज असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने सर्व राज्यांमध्ये या दोन्ही कायद्यांची अंमलबजावणी करावी, असेही राज यांनी सांगितले. 

मोर्चे काढून कोणाला ताकद दाखवताय; राज ठाकरेंचा मुस्लिमांना सवाल

आजघडीला भारताची लोकसंख्या १३५ कोटी आहे. मात्र, त्याला आकार नाही. यामुळे अनेक समस्याही निर्माण झाल्या आहेत. मात्र, इतर देशात राहणाऱ्या आपल्या बांधवांवर धार्मिक अत्याचार होत असतील तर त्यांना आश्रय देणे, हे आपले कर्तव्यच आहे. त्यामुळे CAA आणि NRC लागू करण्यात गैर काय आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.