गेट वे ऑफ इंडियावर नौदलातर्फे 'बिटिंग द रिट्रीट'चं आयोजन

बिटिंग द रिट्रीट कार्यक्रम या शानदार कार्यक्रमात चेतक, सी किंग हेलिकॉप्टर यांनी थरारक प्रात्यक्षिकं सादर केली

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 4, 2017, 11:00 PM IST
गेट वे ऑफ इंडियावर नौदलातर्फे 'बिटिंग द रिट्रीट'चं आयोजन title=

मुंबई : दरवर्षी ४ डिसेंबरला साजरा होणाऱ्या भारतीय नौदल दिनाचं सर्वात मोठं आकर्षण असतं ते मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडिया इथे सादर होणारा बिटिंग द रिट्रीट कार्यक्रम. या शानदार बिटिंग द रिट्रीट कार्यक्रमात चेतक, सी किंग हेलिकॉप्टर यांनी थरारक प्रात्यक्षिकं सादर केली.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

यावेळी नौदल कमांडोंनीही विविध प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. ४ डिसेंबर १९७१ या दिवशी कराची बंदरावर भारतीय युद्धनौकांनी निर्णायक यशस्वी हल्ला केला होता. त्या निमिताने ४ डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो.

पूर्वी सूर्यास्त होताच रणभूमीवर दिवसाची युद्ध समाप्ती होत असे. त्यावेळी दोन्ही बाजूंकडचे योद्धे शस्त्रं म्यान करत असत. तेव्हा रणभूमीवरच्या सैनिकांना परत छावणीत बोलावण्यासाठी विशिष्ट धून वाजवली जात असे. त्यालाच बिटिंग द रिट्रीट म्हणून संबोधलं जातं.

बिटिंग द रिट्रीट हा सोहळा गेटवे ऑफ इंडियामध्ये साजरा होत असताना, अचानक पावसाने लावलेल्या हजेरीमुळे हा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. विशेष म्हणजे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेल्या राज्यपालांनी कार्यक्रम शेवटपर्यंत भर पावसात बघितला. छत्री घेण्यालाही त्यांनी नकार दिला. 

राज्यपालांबरोबर उपस्थितांनीही कार्यक्रम समाप्तीची घोषणा होईपर्यंत भर पावसात कार्यक्रम बघत नौसैनिकांना दाद दिली.

शेवटी एक तासाचा कार्यक्रम पार पडल्यावर पावसाचा जोर वाढल्यानं, २० मिनिटं आधीच कार्यक्रम आटोपता घेण्यात आला.

नौदलातर्फे थरारक प्रात्यक्षिकं