नवदुर्गा : 'नानी' साक्षात् अन्नपूर्णा देवी

नवरात्रीतील पहिलं पुष्प 

Updated: Oct 17, 2020, 07:13 PM IST
नवदुर्गा : 'नानी' साक्षात् अन्नपूर्णा देवी title=

मुंबई : नवरात्रोत्सव हा आदिशक्तीचा जागर करण्यासाठी केला जातो. नवदुर्गांचा महिमा अगाध आहे.त्यासाठी दरवर्षी नवरात्री उत्सव आपण करत असतो.   यावर्षी 'श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट' या संस्थेमार्फत आणि 'फ्रेम मी मीडिया' यांच्या सहकार्याने आणि कलादिग्दर्शक सुमित पाटील यांच्या संकल्पनेतून एक वेगळा उपक्रम राबवण्यात आला.आनंदाची बाब म्हणजे, या अनोख्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची दखल टाटा-पॉवरच्या 'सहेली' गृप कडूनही घेण्यात आली.

 या उपक्रमात प्रामुख्याने महिला सक्षमीकरण, सबलीकरण या विषयावरती भर देऊन काम करण्यात आले आहे. स्त्रियांना  देवी मानल्या जाणाऱ्या आपल्या समाजातील स्त्रिया आणि त्या करत असलेल्या त्यांच्या 'कामाचा गौरव' आणि त्यांच्या 'कर्तुत्वाचा जागर' या मालिकेत करण्यात आला आहे. नवरात्री विशेष नऊ स्त्रियांचे कार्य व्हिडीओ स्वरुपात,नऊ वेगवेगळ्या भागात दाखविण्यात येणार आहेत.

नवरात्रीच्या या नऊ माळांमधील पहिलं फूल आहे 'नानी'. गेली ८४ वर्ष कुड्याच्या पानांचे द्रोण करून, लोकांना पोटभर जेवू घालणाऱ्या आमच्या नानी,म्हणजे आपल्यातली साक्षात अन्नपूर्णा देवीचं. आपल्या रुचकर हातांनी अनेकांच्या पोटाची भूक भागवणाऱ्या प्रेमळ 'नानी' म्हणजेच 'इंद्रायणी गावडे'.

वय वर्षे ८४ असणाऱ्या नानींनी लहानपणी अनुभवलेल्या भुकेच्या झळीला शब्दात मांडणं कठीनच. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाडलोस गावात राहणाऱ्या नानी कुड्याच्या पानांपासून पत्रावळ्या आणि द्रोण तयार करून आपल्या संसाराचा गाडा चालवतात. बाळंतपणात फणसाच्या बिया खाऊन दिवस काढणाऱ्या नानी आज आपल्या हाताने भुकेल्याची भूक भागवण्याचं काम अतिशय मनापासून करतात. त्याचबरोबर आपल्या मायेची ऊब देऊन जेवणातून जीवनात आनंद भरण्याचे काम अविरतपणे करत आहेत.