खेळायला गेला तो परत आलाच नाही... इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्डयात पडून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू

Shocking News: कुठे घडली ही घटना? तुमची मुलंही बांधकाम सुरू असणाऱ्या परिसरामध्ये खेळण्यासाठी जातायत? या मुलासोबत जे घडलं ते जाणून मन विचलित होईल...   

Updated: Dec 12, 2024, 07:08 AM IST
खेळायला गेला तो परत आलाच नाही... इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्डयात पडून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू title=
navi mumbai koparkhairane 7 year boy death after falling on under construction building site

स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : निर्माणाधीन इमारतींच्या परिसरांमध्ये घडणाऱ्या दुर्घटना आजवर अनेकदा समोर आल्या आहेत. त्यातच आणखी एका काळीज पिळवटणाऱ्या घटनेची भर पडली असून, नवी मुंबईमध्ये घडलेल्या या घटनेनं सारेच हादरले आहेत. (Navi Mumbai News)

नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर-5 मध्ये इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्डयात पडून एका 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. अंकित पानसिंग ठनगुगा असं या दुर्घटनेतील मृत मुलाचं नाव सांगितलं जात आहे. घटनास्थळी ज्या बांधकाम साईडवरील खड्डयात पडुन लहानग्या अंकितचा मृत्यू झाला, त्या खड्डयाच्या आजुबाजुला सुरक्षिततेच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली नसल्यामुळे अंकित मित्रासोबत खेळता खेळता त्यात पडल्याचं आढळून आलं. 

कोपरखैरणे पोलिसांनी सदर प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करुन पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या दुर्घटनेत मृत झालेला अंकित हा कोपरखैरणे सेक्टर-5 मध्ये वास्तव्यास असून, तो कोपरखैरणे सेक्टर-4 मधील जिजामाता कॉन्वेंट स्कूल मध्ये शिकत होता. बुधवारी सायंकाळी अंकित शाळेतून घरी आल्यानंतर तो परिसरातील मुलांसह/ मित्रांसमवेत खेळण्यासाठी बाहेर पडला होता. 

हेसुद्धा वाचा : गोंदिया शिवशाही बस अपघातप्रकरणी धक्कादायक माहिती उघड, चालकानेच...

 

खेळतानाच महापालिका शाळेच्या बाजुला खाजगी इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात तो पाय घसरुन पडला. यावेळी अंकित सह खेळणाऱ्या मुलांनी तत्काळ याबाबतची माहिती आपल्या पालकांना दिल्यानंतर नागरीकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी तातडीनं खड्डयातील पाण्यात बुडालेल्या अंकितला बाहेर काढुन रुग्णालयात नेलं. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. बांधकामाधीन इमारतींसाठी खणल्या जाणाऱ्या खड्ड्यात पडून मृत पावलेल्या अंकितच्या जाण्यानं परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त करत सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला.