'राजकीय दबावाशिवाय 48 तास पोलिसांना द्या'; मनसे नेत्या शर्मिला ठाकरेंचे विधान

Sharmila Thackeray : गेल्या महिनाभरात महाराष्ट्रात झालेल्या तीन खळबळजनक आणि हायप्रोफाईल हत्यांमुळे राजकारण तापलं आहे. यावर बोलताना मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांनी पोलिसांना 48 तास ते कायदा सुव्यवस्था सरळ करतील असे म्हटलं आहे.

आकाश नेटके | Updated: Feb 11, 2024, 12:17 PM IST
'राजकीय दबावाशिवाय 48 तास पोलिसांना द्या'; मनसे नेत्या शर्मिला ठाकरेंचे विधान title=

स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : गेल्या काही दिवसांत घडलेल्या गोळीबाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला आहे. गुंड शरद मोहोळ याची गोळ्या घालून हत्या केल्यापासून अद्यापही गोळीबाराच्या घटना सुरुच आहेत. उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या नेत्यावर पोलीस ठाण्यात गोळ्या चालवल्या. तर मुंबईत एका व्यक्तीने ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली. दुसरीकडे चाळीसगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकांची काही अज्ञातांनी खून केला. या घटनानंतर पोलीस प्रशासन देखील अॅक्शन मोडमध्ये आलं आहे.

राज्यात घडत असलेल्या या घटनांवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी आणि मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांनी एक विधान केले आहे ज्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. महाराष्ट्र पोलिसांना 48 तास द्या, कायदा सुव्यवस्था सरळ करतील, असे शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे.

नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे नाका तिथे शाखा या उपक्रमाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी राज्यात सुरु असलेल्या वाढत्या गुन्हेगारी घटनांसंदर्भात महाराष्ट्र पोलीसांना 48 तास द्या कायदा सुव्यवस्था सरळ करण्याचे काम ते चुटकीनिशी करतील. कुठल्याही राजकीय दबावाशिवाय 48 तास पोलिसांच्या हातात द्या. महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहारच्या वाटेवर आहे. ते होऊ नये म्हणून महाराष्ट्र पोलिसांच्या हाती द्या अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी दिली.

काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे?

"राज ठाकरे प्रत्येक भाषणात बोलतात. 48 तास महाराष्ट्र, मुंबई पोलिसांच्या हातात द्या. कायदा सुव्यवस्था सरळ करण्याचे काम ते चुटकीनिशी करु शकतात. कोणत्याही राजकीय दबावाशिवाय 48 तास पोलिसांना द्या. महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहारच्या वाटेवर आहे. ते होऊ नये म्हणून महाराष्ट्र पोलिसांच्या हाती द्या," असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राज ठाकरे म्हणतात की, 'देशात कायदा आहे, पण सुव्यवस्था नाही. पोलिसांना फक्त 48 तास द्या आणि त्यांना घाण साफ करण्यास सांगा, नंतर तुम्हाला परिणाम दिसू लागतील.'