स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात केलेल्या सुधारणांमुळे वाहतूक व्यावसायिक संतप्त झाले आहेत. देशभरात या कायद्याला विरोध दर्शवला जात आहे. त्यामुळे ट्रक चालकांनी दुरुस्तीला विरोध करत देशभरात संप पुकारला आहे. नवी मुंबईतही या कायद्याच्या विरोधात वाहन चालक रस्त्यावर उतरले आहेत. मात्र या आंदोलनाला नवी मुंबईत गालबोट लागलं आहे. उरण जेएनपीटी मार्गावर आंदोलन करणाऱ्या ट्रकचालकांनी पोलिसांना दगडाने आणि बांबूने मारहाण केली आहे.
केंद्र सरकारच्या माध्यमातून मोटार वाहन कायदा पारीत केल्याने राज्यात मोठा वाद सुरु झाला आहे. या विरोधात अवजड वाहतूक करणारे ट्रक चालक रस्त्यावर उतरले आहेत. उरण जेएनपीटी मार्गावरही ट्रक चालकांनी रास्ता रोको करत आंदोलन सुरु केले आहे. मात्र यावेळी पोलिसांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला असता संतप्त चालकांनी पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. आंदोलक ट्रक चालकांनी यावेळी गाड्यांवर दगडफेक करत तोडफोड केली आहे.
केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात सुधारणा केली आहे. दुरुस्तीनंतर वाहन चालकाला 12 वर्षे तुरुंगवास आणि 10 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या दुरुस्तीला ट्रकचालकांनी विरोध सुरु केला आहे. कायद्यातील दुरुस्ती मागे घेण्याची मागणी करत ट्रकचालक आंदोलन करत आहेत. ट्रक चालकांनी या कायद्यातील दुरुस्तीला काळा कायदा म्हटले आहे. या कायद्यात वाहन चालकाला १२ वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद असून सात लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात येणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वाहतूक व्यवसाय पूर्णपणे डबघाईला येणार आहे. ट्रकचालक रात्रंदिवस मेहनत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, असे चालकांनी सांगितले. आता या कायद्याने त्यांना एवढा मोठा दंड कसा भरता येणार, हा थेट आमच्यावरच अत्याचार आहे, असे वाहनचालकांचे म्हणणं आहे.
भंडाऱ्यात ट्रक वाहनाच्या चालकांच्या संपामुळे बससेवा बंद
केंद्र सरकारने ड्रायव्हिंगबाबत केलेल्या नव्या कायदेशीर बदलाविरोधात वाहनचालकांनी बंड पुकारले आहे. त्यामुळे आजपासून ट्रक चालक आणि इतर वाहनाच्या चालकांनी लक्षणीय संप पुकारला आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच भंडारा नागपूर मार्गावर ट्रक चालक आंदोलन करत आहे. त्यामुळे भंडारा नागपूर वाहतूक प्रभावित पडली आहे. भंडारा येथून नागपुरला जाणारी बस बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना याचा त्रास सहन करावं लागत आहे. मात्र बससेवा बंद असल्याने एसटी विभागाला सात लाखांचा फटका बसला आहे.