दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : नारायण राणे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झालीय. नारायण राणे भाजपमध्ये गेलेच तर जाता जाता काँग्रेसला धक्का देऊन जाणार आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे लवकरच भाजपवासी होण्याची चिन्हं आहेत. गेल्या काही दिवसांपासून तशा चर्चा रंगू लागल्यात. नारायण राणे हाच आमचा पक्ष अशी पोस्टरबाजी सोशल मीडियातून रंगतेय... राणेंसोबत कोण कोण भाजप प्रवेश करणार? याचे आडाखे बांधले जातात.
राणे भाजपमध्ये गेले तर त्यांचे पुत्र, कणकवलीचे आमदार नितेश राणे आणि वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर हमखास भाजपमध्ये जातील, असं सांगितलं जातंय. नितेश राणेंनी सोमवारी कट्टर समर्थक आमदार कालिदास कोळंबकर यांची सोमवारी भेट घेतली. विशेष म्हणजे कोळंबकरांनी या निमित्तानं मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक करत सूचक संकेत दिले.
राणेंसोबत नितेश आणि कोळंबकर भाजपमध्ये गेले तर काँग्रेसचं विधानसभेतील संख्याबळ कमी होणार आहे. सध्या काँग्रेसचे ४२ आमदार आहेत. ती संख्या ४० वर घसरेल. याचाच अर्थ काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदावर पाणी सोडावं लागेल. कारण राष्ट्रवादीचं संख्याबळ त्यावेळी काँग्रेसपेक्षा एकने जास्त म्हणजे ४१ असेल... विधानसभेत अशी परिस्थिती निर्माण झाली तर विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसनं केलीय. या पदासाठी राष्ट्रवादीनं विधानसभा गटनेते जयंत पाटील यांचं नावही निश्चित केल्याचं समजतंय.
सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवारांना विरोधी पक्षनेते व्हायचे नाही. या पदासाठी दुसरे महत्त्वाचे नाव म्हणजे दिलीप वळसे-पाटील. पण ते आक्रमक नसल्यानं जयंत पाटील यांच्या नावाला राष्ट्रवादीच्या नेत्यांची पसंती आहे. त्यामुळं राणेंच्या भाजप प्रवेशामुळं काँग्रेसला आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना विरोधी पक्षनेतेपद गमवावं लागेल, एवढं निश्चित.