मुंबई : आज सगळं ठरलं होतं. गाड्या किती वाजता निघणार. कुठे पोहोचणार. घोषणा कधी होणार. सगळं काही ठरलं होतं... पण आयत्यावेळी नारायण राणेंना निरोपच मिळाला नाही. आणि होणार होणार म्हणत राणेंचा पक्षप्रवेश आजही झाला नाही. राणे साहेबांचा आज पक्षप्रवेश होणार होता. आमचं ठरलंयचा जमाना असताना राणेंच्या भाजप पक्षप्रवेशाबद्दल मात्र काही ठरता ठरत नाही आहे.
मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला आहे असं राणेंनी म्हटलं होतं. तर राणेंचा योग्य वेळी निर्णय होईल असं मुख्यमंत्री आज सांगत होते. भाजपसाठी राणे अवघड जागेचं दुखणं झाले आहेत का?. राणेंच्या भाजप पक्षप्रवेशात आड येणारा ग्रह म्हणजे शिवसेना आणि युतीत अडून बसलेला ग्रह म्हणजे नारायण राणे, या दोन्ही ग्रहांची एकमेकांवर वक्रदृष्टी असल्यानं भाजपच्या दारात उभ्या असलेल्या राणेंना उंबरठा काही ओलांडता येत नाही आहे.
भाजप राणेंना आपलं म्हणायला वारंवार हुलकावणी देतं आहे. राणेंनी घर बदललं की त्यांना स्थैर्य नाही, हे काळानं सिद्ध केलं आहे. घर फिरलं की वासेही फिरतात, याचा राजकारणातला अनुभव सध्या राणे घेत आहेत. राणेंबरोबर नितेश आणि निलेश या दोघांचंही राजकीय भवितव्य पणाला लागलं आहे. राणेंबरोबर ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली, त्या सगळ्यांनी इतर पक्षांमध्ये हात पाय पसरले. पण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मात्र आज एकाकी झाले आहेत.