मुंबई : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आज मंगळवारी दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. मंगळवारी संध्याकाळपर्यंत ते दिल्लीत दाखल होणार आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे राष्ट्रपती राजवटीबाबतही चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती आणि यादरम्यान सुरु असलेल्या राजकीय स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी नाना पटोले आज दिल्लीत दाखल होणार आहेत.
सोमवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल झाले होते. त्यांची ही भेट सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलं. शरद पवारांनंतर नारायण राणे राजभवनात राज्यपालांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. राज्यपालांसोबतच्या भेटीदरम्यान नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्रही सोडलं होतं. ठाकरे सरकार कोरोनाचा सामना करण्यात अपयशी ठरलं आहे. त्यामुळे या सरकारला नारळ द्यावा आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी नारायण राणे यांनी केली होती. पैसे कसे उभे करायला पाहिजेत आणि पोलीस यंत्रणा कशी हलवली पाहिजे यांचे ज्ञान या सरकारला नाही, नाचता येईना, अंगण वाकडे अशी सत्ताधाऱ्यांची अवस्था असल्याचंही राणे म्हणाले होते.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, महाराष्ट्रात आम्ही सरकारमध्ये आहोत. पण मोठे निर्णय घेण्याचे आम्हाला अधिकार नाहीत. पण महाराष्ट्रातलं सरकार मजबूत आहे आणि आमचा त्यांना पाठिंबा असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्रातील या सर्व पार्श्वभूमीवर नाना पटोले दिल्लीसाठी रवाना होत आहेत.