अश्लील मेसेज, व्हिडीओ कॉल अन्... महिला पोलिसाच्या मदतीने भरती प्रशिक्षण केंद्रातच मुलींचे लैंगिक शोषण

Nalasopara Crime : पोलिसांकडून मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार नालासोपारा येथून समोर आला आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्रात मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी दोन पोलिसांना अटक केली आहे.  

आकाश नेटके | Updated: Aug 11, 2023, 10:13 AM IST
अश्लील मेसेज, व्हिडीओ कॉल अन्... महिला पोलिसाच्या मदतीने भरती प्रशिक्षण केंद्रातच मुलींचे लैंगिक शोषण title=

प्रथमेश तावडे, झी मीडिया, नालासोपारा : पोलीस दलात (Police Bharti) भरतीचं स्वप्न पाहून अनेकजण आधीपासूनच त्याच्या तयारीला सुरुवात करत असतात. पोलीस दलात हमखास भरती होणार असं सांगत काही संस्था या पोलीस प्रशिक्षण केंद्र देखील चालवतात. पण याच पोलीस प्रशिक्षण केंद्रातच मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सगळा प्रकार समोर आल्या नंतर कायद्याचे रक्षक असलेल्या दोन पोलिसांना अटक करण्यात आली आहे.

नालासोपाऱ्यात पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र चालविणाऱ्या एका पोलीस व त्याच्या मैत्रिणीविरोधातचं मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन पीडित मुलींनी दिलेल्या तक्रारीवरून नालासोपारा पोलीस ठाण्यात विनयभंग तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. समाधान गावडे आणि अनुजा शिगाडे अशी अटक आरोपिंची नावे असून हे दोघे वसई लोहमार्ग पोलिसांत कार्यरत होते. दोन्ही आरोपी नालासोपारा येथे विजयी भव नावाचे पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र चालवत होते.

समाधान गावडे आणि अनुजा शिगाडे यांच्यावर विजयी भव पोलीस प्रशिक्षण केंद्रात येणाऱ्या दोन मुलींनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. . याप्रकरणी दोन पीडित मुलींनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपी गावडे हा मुलींना अश्लील मेसेजेस पाठवता होता तसेच व्हिडिओ कॉल करून अश्लील कृत्य करत होता. शिकविण्याच्या नावाखाली तो या मुलींच्या शरिराला हेतुपूरस्सर चुकीच्या ठिकाणी हात लावत होता. अनेकदा मुलींना पाठलाग करत त्यांच्या घरी जायचा तसेच त्यांना फिरायला बोलवत होता, अशी तक्रार पीडित मुलींनी केली आहे.

या सगळ्यामध्ये समाधान गावडे याची मैत्रीण अनुजा याने त्याच्या कृत्याला पाठिंबा दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनुजाने एका पीडित मुलीचे व्हॉटसप स्कॅन करून आरोपी गावडे बरोबर आक्षेपार्ह संभाषण केले होते. हा प्रकार असह्य झाल्याने या मुलींनी क्लासमध्ये जाणे बंद केले व सर्व प्रकार कुटुंबियांना सांगून नालासोपारा पोलिसांत घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार केली. पोलिसांनी या आरोपिंवर विनयभंग, पोसको व आयटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करत अटक केली आहे..

दरम्यान, नालासोपारा पोलिसांनी आरोपी गावडे आणि त्याची मैत्रीण असलेल्या महिला पोलिसाविरोधात विनयभंगाचे कलम 345, 354 (ड), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2022 च्या (पोक्सो) कलम 8, 12, 17 तसेच माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियमाच्या कलम 66 सी आणि 67 ए अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे.