प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : नालासोपारा (Nalasopara Crime) शहरात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन विकृतांपैकी एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा 3 च्या पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून अटक केली आहे. विशाल कनोजिया असं या आरोपीचे नाव आहे. या आरोपींची माहिती देणार्यास पोलिसांनी बक्षिस जाहीर केले होते. अखेर एका आरोपीला पोलिसांनी (Nalasopara Police) बेड्या ठोकल्या आहेत.
नालासोपारा शहरामध्ये शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून तसेच घराबाहेर खेळणार्या चिमुलकल्या मुलींना आडोशाला नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना घडल्याचे समोर आलं होतं. अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोन जणांवर तुळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्यांचे फोटो प्रसिद्ध करून माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर केले होते. स्थानिक गुन्हे शाखेची तीन विविध पथक या आरोपींच्या शोधासाठी रवाना केली होती. अखेर यातील एका आरोपीला वाराणसीतून अटक करण्यता आली आहे. तर दुसऱ्या एका आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
नालासोपारा शहरात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्या या दोन विकृतांची दहशत पसरली होती. 9 ऑक्टोबर आणि 15 नोव्हेंबर रोजी दोन वेगवेगळ्या प्रकरणात या आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. विकृतांच्या या कृत्यामुळे पालक धास्तावले होते. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी कठोर पावले उचलली. दोन्ही आरोपीचे फोटो पोलिसांनी प्रसिध्द करून त्यांची माहिती देणार्यास बक्षिसही जाहीर करण्यात आले होते. तसेच तीन पथकांद्वारे शोधदेखील सुरु होता.
या दोघांपैकी एक आरोपी उत्तर प्रदेश मध्ये असल्याची माहिती गुन्हे शाखा 3 च्या पथकाला मिळाली. त्यांनी तात्काळ उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाच्या मदतीने वाराणसी येथील केंट रेल्वे स्थानक परिसरातून विशाल कनोजियाला अटक केली. विशाल नालोसापाऱ्यात राहून कॉम्प्युटरचे सुटे भाग विकण्याचे काम करायचा. 15 नोव्हेंबर रोजी त्याने नालासोपारा येथील 9 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून पळ काढला होता. अखेर उत्तर प्रदेशात विशाल पोलिसांच्या हाती लागला.