मुंबई : टीव्ही बघणं ही तशी सामान्य गोष्ट आहे. मात्र चेंबूरमध्ये एका व्यक्तीला टीव्ही बघणे चांगले महागात पडले आहे. पत्नीने टीव्ही बघणा-या पतीवर चाकूने हल्ला केलाय. पत्नीच्या बोलण्याकडे पतीने लक्ष न दिल्याने टीव्ही बघण्यात गुंग असलेल्या पतीवर संतापलेल्या पत्नीने हा हल्ला केला.
सतत टीव्ही बघत बसणे, घरात लक्ष न देणे, महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे या कारणाने पतीवर वैतागलेल्या या महिलेने चाकूहल्ला केलाय. सोमवारी रात्री चेंबूर वाशीनाका येथील म्हाडा कॅालनी परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी चेंबूरच्या आरसीएफ पोलिस ठाण्यात पत्नीविरोधात पतीने गुन्हा दाखल केला आहे.
सुरेश दास हे त्याची पत्नी शांती दास आणि दोन मुलांसोबत राहतात. रात्री आपल्याला काही महत्त्वाचे बोलायचे असल्याचे शांती यांनी त्यांना सांगितले. मात्र नंतर बोलूया, असे सांगून त्यांनी शांतीला टाळले. त्यानंतर दास टीव्ही बघत बसले. शांतीने अनेकदा हाक मारूनदेखील त्यांनी लक्ष न दिल्याने दोघांमध्ये भांडण झाले. अशात राग अनावर झालेल्या शांती यांनी घरातील चाकूने दास यांच्यावर वार केले. या हल्ल्यात दास यांच्या दंडाला गंभीर जखम झाल्याने त्यांना केअरवेल रुग्णालयात नेण्यात आले.