हाडवैर की राजकीय शत्रुत्व? मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांची हत्या का केली?

Abhishek Ghosalkar Murder Case : मुंबईतल्या दहिसरमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला. मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांची हत्या का केली. पूर्ववैमनस्य, मतदार संघावरचा दावा, तुरुंगवारी की आणखी काही. हत्येमागे अनेक प्रश्न आहेत. 

राजीव कासले | Updated: Feb 9, 2024, 07:38 PM IST
हाडवैर की राजकीय शत्रुत्व? मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांची हत्या का केली?  title=

Abhishek Ghosalkar Murder Case : गोळीबारात मृत्यू झालेले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांचं पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव पाहून त्याचे वडील आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांनीही टाहो फोडला. विनोद घोसाळकर हे शिवसेनेचे उपनेते. त्यांनी आपलं आयुष्य शिवसेनेला आणि राजकारणाला वेचलं. त्यांच्यापाठोपाठ त्यांचा मुलगा अभिषेकनेही राजकारणात पाऊल ठेवलं. नगरसेवक बनला. आता त्याच मुलाचं पार्थिव पाहून विनोद घोसाळकरही सुन्न झाले होते.

तर अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी ढसाढसा रडताना दिसत होत्या. अभिषेक यांना दोन लहान मुलं आहेत. मात्र आज त्यांच्या डोक्यावरुन बापाचं छत्र हरवलंय. आता पुढे काय असा प्रश्न त्यांच्या पत्नीलाही सतावत होता.. तेच दृश्यांमधूनही दिसत होतं. अभिषेक यांच्या पत्नीचं, मुलीचं तसंच त्यांच्या आईचं रडणं मन हेलावून टाकणारं होतं.

काय घडलं हत्येच्या दिवशी?
मारेकरी मॉरिसच्या (Morris) ऑफिसच्या बाजुलाच अभिषेक यांचं ऑफिस आहे. मॉरिसने हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता, ज्यात महिलांना साड्यांचं वाटप करण्यात येणार होतं. त्याआधी मॉरिसने अभिषेक यांना त्याच्या ऑफिसमध्ये नेलं. जुने वाद मिटवत नव्याने काम करण्याच्या आणाभाका घेतल्या गेल्या.  मात्र फेसबुक लाईव्ह संपताच मॉरिसने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या.

कोण आहे मॉरिस?
मॉरिस हा स्थानिक पातळीवर स्वयंघोषित नेता म्हणून ओळखला जायचा. मॉरीस हा अट्टल गुन्हेगार होता अशी माहितीही मिळतेय. एका महिलेवर बलात्कार केल्याचा आणि तिला लाखो रुपयांना फसवल्याचा आरोप मॉरिसवर आहे.  याच आरोपांखाली मॉरिस तुरुंगातही होता. बलात्काराच्या याच प्रकरणामुळे मॉरिसने घोसाळकरांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. मॉरिसच्या पत्नीने दिलेला जबाब यात महत्त्वाचा ठरलाय.

मॉरिसच्या पत्नीचा जबाब 
अभिषेक घोसाळकरांनी बलात्कार प्रकरणात गोवल्याची मॉरिसची समजूत होती. काहीच दिवसांआधी मॉरिस जेलमधून बाहेर आला होता. मात्र अभिषेक घोसाळकरांविषयीचा राग त्याच्या मनात कायम होता.  मी अभिषेकला सोडणार नाही. त्याला संपवणारच, हे एकच वाक्य मॉरिस सतत बोलायचा. 

आपल्या अटकेत अभिषेक घोसाळकरांचा हात असल्याची मॉरिसची समजूत होती. मॉरिसच्या डोक्यात तेव्हापासूनच अभिषेक घोसाळकरांना संपवण्याचा कट सुरु होता. याच रागातून मॉरिसने अभिषेक यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला. फेसबूक लाइव्ह संपल्यावर अभिषेक घोसाळकर उठून उभे राहिले. त्याचवेळी मॉरिसने त्यांच्यावर सलग पाच गोळ्या झाडल्या.  गोळ्या झाडल्यानंतर अभिषेक गंभीर जखमी झाले. त्याच अवस्थेत ते दरवाजातून बाहेर पडले. बाहेरच्या समर्थकांनाही अभिषेक घोसाळकरांना गोळी लागल्याचं समजलं.