मुंबईत वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार वाढणार? कोणी काळजी घेण्याची गरज? जाणून घ्या

Mumbai Health Update: शरीराची स्वतःची यंत्रणा शरीराचे तापमान राखते. हवामानातील अचानक बदलाचा परिणाम माणसाच्या शरीरावर होतो.

Updated: Oct 13, 2023, 11:07 AM IST
मुंबईत वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार वाढणार? कोणी काळजी घेण्याची गरज? जाणून घ्या title=

Mumbai Health Update: मुंबईकरांना सध्या एकीकडे ऑक्टोबर हीटचा सामना करावा लागत आहे तर दुसरीकडे परतीच्या पावसाचीही शक्यता आहे. मुंबईत सातत्याने बदलत चाललेल्या हवामानाचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होऊ शकतो. 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या काही भागात अवकाळी रिमझिम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसे झाल्यास मुंबईकरांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळेल. पण यासोबत विषाणूजन्य आजार आणि डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढू शकतो, अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे. 

मुंबाईतील सध्याचे तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान आहे.मुंबईतील हवामानात होणारा अचानक बदल नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम करु शकतो, अशी चिंता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. तापमानात वाढ, अवकाळी पाऊस, शरीराला जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो. प्रतिकारशक्ती चांगली असलेले नागरिकच हे बदल बर्‍याच प्रमाणात सहन करतात. पण आजारी, प्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या व्यक्तींना यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. उच्च तापमानामुळे, लोक स्ट्रोक, हायपोटेन्शन, सिवियर डिहायड्रेशन आणि त्यामुळे साखरेच्या पातळीत चढ-उतार यासारख्या आरोग्य समस्यांना बळी पडू शकतात, असे डॉक्टर सांगतात.

गुरुवारी मुंबई उपनगराचे कमाल तापमान 34.7 अंश सेल्सिअस तर शहराचे 31.3अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली. कडक उन्हामुळे लोकांना घाम फुटत आहे. अशा परिस्थितीत लोकांना हायड्रेशनकडे लक्ष देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. 

मधुमेही रुग्णांसाठी साखरेची पातळी राखणे अत्यंत आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत तापमान खूप जास्त असताना रुग्णाची शुगर जास्त असेल तर शरीरातील पाणी लघवीद्वारे बाहेर पडते. वारंवार लघवी केल्याने शरीरात पाण्याची कमतरता होते आणि व्यक्ती गंभीर डिहायड्रेशनमध्ये जाते. अशावेळी किडनीला तात्पुरते किंवा कायमचे नुकसान होऊ शकते, अशी माहिती केईएम रुग्णालयाच्या एंडोक्राइनोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ.तुषार बंडगर यांनी दिली. 

वृद्ध आणि आजारी नागरिकांनी घ्या काळजी

शरीराची स्वतःची यंत्रणा शरीराचे तापमान राखते. हवामानातील अचानक बदलाचा परिणाम माणसाच्या शरीरावर होतो. हवामानात अचानक बदल झाल्यामुळे वृद्ध लोकांच्या आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. मुंबईत उष्णतेसोबत आर्द्रताही आहे. अशा स्थितीत तापमानात घट झाल्यास विषाणूजन्य ताप वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वृद्ध आणि आजारी नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.