Andheri Water Supply News In Marathi : मुंबईकरांसाठी पाणीपुरवठ्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत (Mumbai Water Cut) ठिकठिकाणी जलवाहिन्याच्या कामासाठी सोमवारी (5 जून 2023) ला अंधेरी, जोगेश्वरी, सांताक्रूझ येथील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. परिणामी काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान 5 जूनला अंधेरी, जोगेश्वरी, सांताक्रूझ येथे सकाळी 8 वाजल्यापासून ते मध्यरात्री 12 पर्यंत म्हणजेच 16 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी नमूद केलेल्या कालावधीत पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच पाणीकपातीच्या काळात काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
वाचा: महाराष्ट्रात कुठे स्वस्त तर कुठे महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
अंधेरी पूर्व येथील महाकाली गुंफेजवळील बीडी सामंत मार्ग चौकात नवीन 1500 मिमी व्यासाची पाइपलाइन टाकण्याचे आणि 1200 मिमी पार्ले आउटलेटला जोडण्याचे काम सोमवारी करण्यात येणार आहे. जलवाहिनी जोडण्याचे काम सोमवारी सकाळी 8 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पालिकेच्या जल अभियांत्रिकी विभागामार्फत हाती घेण्यात येणार आहे. परिणामी पाइपलाइन जोडणी व दुरुस्तीचे काम 16 तास चालणार आहे.
दुरुस्तीमुळे सोमवारी सकाळी 8 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जोगेश्वरी पूर्वसह अंधेरी पूर्व आणि पश्चिम भागात पाणीपुरवठा होणार नाही. जोगेश्वरी पूर्व भागात त्रिपाठी नगर, मुन्शी कॉलनी, बस्ती वाला कंपाउंड, कलेक्टर कॉलनी, दुर्गा नगर, मातोश्री क्लब, दुर्गा नगर परिसराचा समावेश आहे.
अंधेरी पूर्व भागात विशाल हॉल, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकर वाडी, विमा नगर, गुंदवली गावठाण पंथकी बाग, तेली गली, कोलडोंगरी, जीवा महाले रोड, सायवाडी, जीवन विकास केंद्र मार्ग यांचा समावेश आहे. याशिवाय शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान रोड, श्रद्धानंद रोड, नेहरू रोड, तेजपाल रोड, शास्त्री नगर, राजेंद्र प्रसाद नगर, आंबेडकर नगर, काजुवाडी या भागात पाणी येणार नाही. तसेच विलेपार्ले पूर्व येथील देशांतर्गत विमानतळ, अमृत नगर, रामबाग, चकाला गावठाण, चकाला वाजन काटा आणि मोरा गाव आणि अंधेरी पश्चिमेतील जुहू गाव परिसराला पाणी मिळणार नाही.